सभागृहाचे कामकाज तहकूब करून घेतली बैठक : अखेर विरोधी गटाला 60 तर सत्ताधारी गटाला 40 टक्के निधी
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या महिन्याभरापासून महानगरपालिकेतील निधी वाटपावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये वाद उफाळून आला होता. सर्वसाधारण बैठकीच्या तोंडावरच ही घटना घडली. त्यानंतर विरोधी गटाने वेगवेगळ्या पद्धतीने इशारे दिले होते. शुक्रवारी बैठकही झाली होती. तरीदेखील शनिवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये खडाजंगी झाली. बैठक तहकूब करून मोजक्या नगरसेवकांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्धातास बैठकीचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधी गटाला 60 टक्के व सत्ताधारी गटाला 40 टक्के असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.
शनिवारी महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. बैठक सुरू होताच मागील बैठकीचा इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी देण्याचे महापौरांनी सांगितले. मात्र विरोधी गटाने प्रथम निधी वाटपावर बोलावे, त्यानंतर इतिवृत्त वाचन केले जाईल, असा आग्रह धरला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये खडाजंगी झाली. शेवटी सभागृहाच्या बाहेर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
महापौरांच्या कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. त्याठिकाणी विरोधी गटाच्या नगरसेवकांना 60 टक्के निधी तर सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांना 40 टक्के निधी देण्याचे ठरविण्यात आले. या वादावर तोडगा काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा सर्वसाधारण बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीमध्ये स्थायी समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र सत्ताधारी गटामधीलच नगरसेवकांमध्ये वाद असल्याचे दिसून आले.
शिक्षण-आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत ठरावांवर चर्चा
शिक्षण व आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नूतन स्थायी समितीच्या सदस्यांनी यापूर्वीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी केलेले ठराव रद्द करून त्याची चौकशी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक रवी धोत्रे यांनी आम्ही कोणत्याही प्रकारचा घोटाळा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. यावेळी विरोधी गटाच्या नगरसेवकांनीही त्याबाबत आवाज उठविला. मात्र सत्ताधारी गटामध्येच हा वाद असल्याचे सभागृहात दिसून आले. पुढील बैठकीत यावर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी कौन्सिल सेक्रेटरी महेश जे. यांना स्थायी समितीमध्ये झालेल्या ठरावाच्या नियमांबद्दलची माहिती विचारण्यात आली. त्यावेळी बरीच वादावादी झाली. मात्र सत्ताधारी गटनेते गिरीष धोंगडी आणि नगरसेवक अॅड. हणमंत केंगाली यांनी पुढील बैठकीत यावर चर्चा करू, असे सांगितले. आमदार राजू सेठ यांनी बैठकीवेळी नगरसेवकांना सल्ला दिला.









