चिपळूण :
नव्या सर्व्हेक्षणानुसार हातात पडलेल्या मालमत्ता कराच्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहीजण कर भरत असले तरी आतापर्यंत २८० जणांनी यावर हरकती घेतल्या आहेत. तर कोणत्याही पद्धतीचा कर वाढला नसल्याचा खुलासा नगर परिषद प्रशासनाने केला आहे.
दोन वर्षापूर्वी शासनाने नेमलेल्या एजन्सीकडून येथे प्रत्यक्ष तसेच ड्रोनद्वारे अत्याधुनिक पद्धतीने मालमत्तांचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र या सर्व्हेनुसार आकारलेला कर भरण्यास नागरिकांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन मंत्री उदय सामंत यांनी याला स्थगिती दिली होती. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. मात्र आता शासनाने या सर्व्हेनुसारच मालमत्ता कर घेण्याचे आदेश सर्वच नगर परिषदांना दिले आहेत. त्यामुळे यावर्षी त्यानुसार कराच्या नोटीसा नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे या सर्व्हेनुसार ज्यांच्या मालमतांचा आकार वाढला आहे, ज्यांनी नवीन बांधकामे केली आहेत, ज्यांचा झोन बदलला आहे व ज्यांना यापूर्वी करच आकारला गेला नव्हता, अशांच्या करात वाढ झाली आहे.








