मार्केट पोलीस स्थानकासमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन : माफी मागितल्यानंतर प्रकरणावर पडदा
बेळगाव : सफाई कर्मचाऱ्याला भोई गल्ली येथे मारहाण करण्यात आल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी मार्केट पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले. या प्रकारामुळे महानगरपालिकेचे अधिकारीही मार्केट पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र मारहाण करणाऱ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची माफी मागितल्याने त्यावर पडदा पडला आहे. ज्योतीनगर येथील अमित लाखे हा स्वच्छता कर्मचारी भोई गल्ली येथे स्वच्छता करत होता. यावेळी त्याच्यासोबत इतर स्वच्छता कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षकही उपस्थित होते. अचानक तेथील एकाने अमित लाखे याला मारहाण केली. यामुळे सर्वच स्वच्छता कर्मचारी संतापले. कामबंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट पोलीस स्थानक गाठले.
बुधवारी सकाळीच पोलीस स्थानकासमोर ठाण मांडण्यात आले. महानगरपालिकेच्या एससीएसटी नोकर संघाच्या अध्यक्षा मंजुश्री या देखील दाखल झाल्या. याचबरोबर साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी, स्वच्छता निरीक्षक एस. एम. कुरबेट हे देखील दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार देण्यास गेले असता मारहाण केलेली व्यक्ती तेथे आली व त्याने सर्वांची माफी मागितली. यापुढे असा प्रकार घडणार नाही म्हणून त्याने विनंती केली. यापुढे कोणीही स्वच्छता कर्मचाऱ्याला हात लावला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देण्यात आला. मंजुश्री यांनीही त्या व्यक्तीला चांगलेच धारेवर धरले. स्वच्छता करायला कोणीच तयार नसते. हे सर्व स्वच्छता करत आहेत. यांचे प्रथम आभार माना. तुम्ही घर तरी कधी स्वच्छ करता का? असा प्रश्नही संबंधिताला विचारला. याचबरोबर कर्मचाऱ्यांनीही यापुढे कोणीही तुम्हाला हात लावला तर त्याचवेळी त्यांना हिसका दाखवा, असेदेखील सांगितले. अखेर पोलीस स्थानकामध्ये चर्चा करून त्यावर पडदा टाकण्यात आला आहे.









