सुरक्षेसाठी बसविली इंटरलॉक सिस्टम : प्रणाली अधिक सुरक्षित असल्यामुळे सहकार्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेचे आधुनिकीकरण केले जात असून अत्याधुनिक अशा इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा वापर केला जात आहे. यामुळे रेल्वेगेट उघडताना उशीर होत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ही प्रणाली अधिक सुरक्षित असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.
बेळगावमधील पहिले, दुसरे व तिसरे रेल्वेफाटकानजीक होणारी गर्दी व वाहतूक नियंत्रण ही नेहमीचीच समस्या आहे. गेट बंद झाले की, चारही बाजूंनी वाहतूक कोंडी होते. प्रत्येकाला वाहन रेटण्याची घाई असल्याने वाहनचालक कोणतेही नियम पाळत नाहीत. गेट उघडण्यास विलंब होतो याचे कारण हे तांत्रिक आहे, हे अनेकांना माहिती नाही. गेटमन फाटक उघडण्यास विलंब करतो, अशी भावना वाहनचालकांची असते.
अधिक रहदारी पोलीस नेमण्याची गरज
शहराच्या दक्षिण भागात अनेक शिक्षण संस्था, कार्यालये, औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालकांची येथून ये-जा असते. सध्या रेल्वेगेटनजीक एका रहदारी पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु एका पोलिसाकडून वाहतूक केंडी सुरळीत करणे अवघड होत आहे. त्यामुळे 3 ते 4 पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. वाहनचालकांनीही एकाच बाजूने वाहने रेल्वेगेटमध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते.
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करूनच ही सिस्टम
पहिले रेल्वेगेटनजीक नवीन तंत्रज्ञान असलेले रेल्वेगेट बसविण्यात आले आहे. इंटरलॉक सिस्टममुळे सुरक्षिततेसाठी वेळाने रेल्वेगेट उघडत आहे. जोवर रेल्वे निघून पुढे सिग्नल देत नाही तोवर रेल्वेगेट उघडत नाही. गेट उघडण्यास काही मिनिटांपुरता गैरसोय होत असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करूनच ही सिस्टम बसविण्यात आल्याचे रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









