गोवा डेअरी रू. 14 कोटीवरून रू. 6 कोटी तोटय़ात -राजेश फळदेसाई : चौकशीनंतर सन 2019 सालचे फेरऑडीट जशास तसे कॉपी पेस्ट
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ (गोवा डेअरी) महिन्याभरापुर्वी रू 14 कोटी तोटय़ावरून सरळ नवीन ऑडीटनुसार रू 6 कोटी रूपये तोटय़ात आल्याची माहिती डेअरीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी दिली. सद्यपरिस्थितीत गोवा डेअरी नेमकी किती नुकसानीच्या खाईत आहे याबाबत राज्यातील दुध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
काल शुक्रवारी कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनात डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली गदाराळोत ही आमसभा संपन्न झाली. यावेळी गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक पराग नगर्सेकर, सहकार निबंधक कार्यालयाचे पंकज मराठे व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. वार्षिक आमसभेला 178 सोसायटय़ापैकी केवळ 111 सोसायटय़ाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोवा डेअरीच्या चालू आर्थिक वर्ष 2022 च्या नवीन ऑडीटनुसार गोवा डेअरी रू 6 कोटी नफ्यात असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना राजेश फळदेसाई म्हणाले दुध विक्री वाढविण्यासाठी आपला भर राहणार आहे. प्रशासकाच्या कार्यकाळात गोवा डेअरीला नुकसानी सहन करावी लागलेली आहे. प्रशासकाच्या कार्यकाळातील झालेल्या व्यवहारासंबंधी ऑडीटरनी शेरा मारलेला असून त्याची कसून चौकशी केली जाईल. दोन महिन्यात सर्व प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
गोवा डेअरीचे नुकसानीच्या आकडय़ामध्ये तफावत
गोवा डेअरीची नुकसानी रू. 14 कोटी किंवा नवीन ऑडीटरनुसार रू. 6 कोटीच्या घरात पोचली आहे हे सत्य दुध उत्पादकांना पचविण्यासाठी उर्वरीत रक्कम डेअरीला कंत्राटदाराकडून डेअरीला येणे बाकी असल्याचा कांगवा अध्यक्षांनी केला आहे. प्रशासकाने नेमलेल्या त्रीसदस्यीय समितीच्या कार्यकाळात दुध उत्पादकांना दीड कोटी रूपये दरफलक कसा काय वाटण्यात आला? त्या आर्थिक वर्षात रू. 3.90 कोटी नफा कसा मिळवला हेच एक मोठे कोडे बनलेले आहे. वारंवार प्रशासकाच्या कार्यकाळात गोवा डेअरीला नुकसानी सोसावी लागली यात किती तथ्य आहे हे प्रश्नही कालच्या आमसभेतही अनुत्तरीत राहिलेले आहे. केवळ ऑडीटर नेमून चौकशी करण्यापुरती दुध उत्पादकांच्या डोळयात धूळ फेकण्याचे प्रकार प्रत्येक आमसभेत सुरू असल्याचा आरोप सत्तरी येथील एका दुध उत्पादकाने केला आहे.
निलंबित काळें यांनी मोठी जबाबदारी देण्यामागे कुणाचा स्वार्थ?
सद्यस्थितीत डेअरीवर कार्यरत असलेल्या संचालक मंडळाने डेअरीच्या कथित घोटाळाप्रकरणी माजी व्यवस्थापकीय संचालकासह संशयित असलेल्या मुख्य लेखपाल राधिका काळे यांचे निलंबनाचे आदेश मागे घेऊन ऑडीटच्या कामकाजात का सामावून घेतले? अशा घणाघाती आरोप करीत दुध उत्पादक रमेश नाईक यांनी संचालक मंडळाचा खरपूस समाचार घेतला. संचालक मंडळ घोटाळेखोरांना प्रोत्साहन देत असून यामागे कोणत्य़ा व्यक्तीचा स्वार्थ दडलेला आहे? संशयित काळे यांच्याविरोधात जोपर्यत चौकशी पुर्ण होत नाही तापर्यंत त्याना निलंबित स्थितीत ठेवावे अशी मागणीनाईक यांनी केली आहे.
कोविड काळात दीड कोटी दरफलकाचे वितरीत-दुर्गेश शिरोडकर
गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी आपल्या कार्यकाळात सन 2019 साली गोवा डेअरीला रू. 3.90 कोटी नफा यावर ठाम राहिलेला आहे. नवीन ऑडीटरनेही पुर्व प्रकाशित ऑडीट रिपोर्ट कट-पेस्ट केल्याने ते स्पष्ट झाल्याचे कागदोपत्री पुराव्यानिशी प्रसारमाध्यमाशी बोलताना आपली बाजू मांडली. आपल्या कार्यकाळात दुध उत्पादकांना दरफलकाच्या रूपात दीड कोटी वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले. संचालक मंडळाने यापुर्वीही डेअरी तोटय़ात असताना शेतकऱयांना दरफलक वितरीत केला असल्याची बाब निदर्शनास आणून दिला. कोविड महामारीच्या काळात दुध उत्पादक जीवाची तमा न बाळगता दिलेल्या सेवेमुळेचे आपण हा दरफलक वितरीत केल्याचे नमूद केले. डेअरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गुरांना लम्पी वायरसच्या जागृतीसाठी मार्गदर्शक पुस्तिका आपल्या कार्यकाळात प्रकाशन करण्यात आले होते तसेच स्वतः सोसायटयांना वितरीत करण्यात आल्याची माहिती देताना डेअरी अध्यक्षांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असा इशारा दिला. स्वतः सरकारने नेमलेल्या प्रशासकाच्या कार्यकाळात डेअरी तोटय़ात की नफ्यात याची निवांत चौकशी करावी. त्याचबरोबर दुध उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवित येत्या काळात आपण डेअरी आर्थिक वर्षात केलेली नफ्याची बरोबरी करून दाखवावी असे आव्हान फळदेसाई यांना दिले आहे.