दहिवडी :
दहिवडी-फलटण या द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे यांच्याकडून रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीसा देऊन त्यांची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीही करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने कामाचा सर्व्हे करून मोजमाप सुरू केले आहे. मात्र रस्त्याच्या कामासंदर्भात व भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांत रस्त्यालगतच्या संभ्रमावस्था दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने शेतकऱ्यांचा संभ्रम दूर न केल्यास काम अडविण्याच्या तयारीत शेतकरी दिसून येत आहेत.
दहिवडी-फलटण रस्ता द्रुतगती महामार्ग होणार याबाबत अनेक वर्षे चर्चा चालू होती. अखेर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला. मंजुरी मिळाल्याने रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी रस्त्याचा सर्व्हे, मोजमाप करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ज्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यात जाणार आहे, त्या रस्त्यालगतच्या अल्प शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीसा पाठवून मोजणी करून घेतली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यात जाऊनही त्यांना नोटीसा आल्या नाहीत. मात्र त्यांच्या सातबारावरून रस्त्यात गेलेले क्षेत्र कमी झाले नाही. जर महामार्ग विभाग म्हणत असेल की त्या रस्त्याचे क्षेत्र आमचेच आहे, तर त्याचा काही तरी पुरावा शेतकऱ्यांना दाखवावा. पुरावा नसेल, तर आता ज्या क्षेत्रातून रस्ता गेला आहे, त्याचाही मोबादला शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे, अशी चर्चा आहे. रस्त्याच्या कामासाठी काही ठिकाणी मशिनरी आल्या आहेत, पण तेथील शेतकरी विरोध करत आहेत.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून रस्ता करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी काम अडवून कोर्टातही जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. सोशल मीडियावर या रस्त्याच्या कामाचे लाईनआऊट केलेला प्रोजेक्ट फिरत असून त्यात खूप मोठा रस्ता दिसून येत आहे. यात अनेकांची घरे, दुकाने जाताना दिसून येत आहेत. त्यामुळेही संभ्रम निर्माण झाला आहे.
- चालू रस्ता आजही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर
दहिवडी-फलटण रस्ता ज्या क्षेत्रातून गेला आहे, ते क्षेत्र आजही संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावर आहे. ते कमी झालेले नाही. त्यामुळे त्या जागेवर आजही शेतकऱ्यांचा हक्क दिसून येत आहे. त्या क्षेत्रावर महामार्ग हक्क दाखवत असेल, तर पुरावे द्यावेत किंवा पुरावे नसतील तर त्याही क्षेत्राचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.
– रवींद्र बाबर, अध्यक्ष, नेहरू युवा मंडळ, बिजवडी
- …अन्यथा आंदोलन, कोर्टाचा मार्ग
राष्ट्रीय महामार्ग विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. वास्तविक आताचा रस्ताही शेतकऱ्यांच्याच सातबारावर दिसून येत आहे. अन् आता नव्याने रस्त्यासाठी क्षेत्र घेतले जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना जागृत करून योग्य ती माहिती द्यावी; अन्यथा शेतकरी आंदोलन करून कोर्टातही जाऊ शकतात.
-डॉ. अजित दडस, माजी सरपंच, पांगरी








