या जगातील प्रत्येक मानवसमूहाची एक वेशिष्ट परंपरा आहे. काही परंपरा आश्चर्यकारक आहेत, काही विस्मयकारक आहेत, काही अद्भूत तर काही अनाकलनीय परंपरा आहेत. तथापि, काही अत्यंत घृणास्पद किंवा निंदनीय परंपराही आहेत. आफ्रिका खंडातील मसाई जनजाती समुदायात अशी एक प्रथा आहे. या प्रथेनुसार या समाजातील मुलगा वयात आला, की त्याला आपले पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी बलात्कार करावा लागतो. आश्चर्य म्हणजे या समाजातील महिलांना याचे काहीही वैषम्य वाटत नाही. उलट त्यांनाही या परंपरेचा अभिमान असल्याचे दिसून येते. हा समुदाय मुख्यत्वेकरुन टांझानिया आणि केनिया या देशांमध्ये आहे. त्याची संख्याही लक्षणीय आहे. तसेच हा समुदाय आर्थिकदृष्ट्या संपन्नावस्थेत आहे. या समाजातले अनेक लोक सुशिक्षित आहेत. तरीही ही प्रथा या समाजात पाळली जाते आणि त्याचे बहुतेकांना काहीही वाटत नाही.
हा पितृसत्ताक समाज असून पुरुषांच्या हाती कुटुंबाची आणि समाजाची सर्व सूत्रे असतात. महिलांना मुख्यत्वे घरची कामे आणि मुलांचे संगोपन अशी कामे करावी लागतात. या समुदायातील वयात आलेल्या मुलांना गावातील कोणत्याही महिलेशी शारिरीक संबंध ठेवण्याची अनुमती आहे. असे संबंध ठेवताना महिलेच्या इच्छेचा विचार करावा लागत नाही. या समाजात स्त्री-पुरुषांना शारिरीक संबंधांना अनुसरुन अनेक रिती रीवाज आहेत, अशी माहिती सोशल मिडियावर दिली जाते.
तथापि, असाही एक मतप्रवाह आहे, की या समाजामध्ये अशी बलात्काराची कोणतीही परंपरा नाही. या समाजासंबंधी अनेक गैरसमज हेतुपुरस्सर पसरविण्यात येत आहेत. त्याच्यापैकीच हा एक समज आहे. या समाजात स्त्री-पुरुष संबंध अत्यंत पवित्र पद्धतीने सांभाळले जातात. त्यांच्यात कोठेही सक्तीचा संबंध येत नाही. मात्र, अशी प्रथा पूर्वी होती, असेही काही जणांचे मत आहे.
आज या समाजातील महिला शिक्षणात प्रगती करीत आहेत. त्यामुळे अनेक जुन्या आणि त्याज्य परंपरा नष्ट होत आहेत. याच प्रक्रियेत ही प्रथाही जवळपास नष्ट झाली आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. या उलटसुलट मतमतांतरांमुळे या समाजात अशी परंपरा आहे, होती की कधीच नव्हती, याविषयी गोंधळ निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावरची वृत्ते किंवा माहिती कित्येकदा संशयास्पद असते, असा अनुभव येतो. या कथित प्रथेसंबंधीची माहिती हा त्यातीलच प्रकार आहे, की ते सत्य आहे, हे सांगता येणे कठीण आहे. मात्र, सोशल मिडियावरच्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये, एवढा धडा या घटनेतून निश्चितच मिळतो.









