प्रतिनिधी / बेळगाव : रविवारपेठ येथील कांदा मार्केटचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना सोमवारी रात्री अचानक त्या ठिकाणी नव्याने खोका उभे करण्यात आला. ही घटना सकाळी उघडकीस आली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी सध्या कब्जेदार असलेल्या कांदा मार्केटच्या व्यापार्यांनी खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली आहे.
रविवारपेठ येथील सर्व्हे क्रमांक 964 क्रमांकामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खोकीधारक आहेत. या जागेचा वाद महापालिका तसेच खोकीधारकांमध्ये आणि एका व्यक्तीमध्ये सुरू आहे. जिल्हा न्यायालयाबरोबरच उच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे. त्या खटल्याच्या निकालाची वाट सारेजण पहात आहेत. मात्र अचानकपणे अशा प्रकारचे खोका उभारणी करणे तसेच जागा कब्जेदार घेण्यासाठी येण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे व्यापार्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खोका उभे करताना जुना खोका हटविण्यात आली. त्यामधील गुळ, नारळ, बटाटा, कांदा, अल्ले, लसूण यासह इतर साहित्य चोरुन नेण्यात आले आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता. सकाळी तेथील व्यापार्यांनी तो खोका हटविण्याचे काम सुरू केले होते. पोलीस संरक्षणातच हे काम केल्याचा आरोप येथील व्यापार्यांनी केला आहे. एकूणच यामध्ये पोलिसांना हाताशी धरुन हा प्रकार सुरू असून या प्रकारामुळे शहराची शांतता भंग होण्याची शक्यता आहे. तेंव्हा तातडीने जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापार्यांनी केली आहे.
सोमवारी रात्री महावीर खोत, मजिद्द मोकाशी, जुबेर उचगावकर, फजल डोणी यांचे गाळे हटवून त्याठिकाणी नवीन गाळे उभे करण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी हे काम केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. याचबरोबर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आम्ही जागा देण्यास तयार आहे. मात्र न्यायालयात खटला प्रलंबित असताना अशा प्रकारे दहशत माजविण्याचा प्रयत्न ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी कोणत्याहि परिस्थतीत न्यायालयाचा अवमान करु नये, अन्यथा तीव्र आंदोलनाबरोबरच न्यायालयामध्ये अवमान याचिकादाखल केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेनंतर सकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात दुकान व्यावसायिक तसेच इतर नागरिक जमले होते. यावेळी ललिता सावंत, शोभा कित्तूरकर, गंगा पाटील यांच्यासह इतर व्यापार्यांनीही या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.









