दक्षिण चीन समुद्रातील प्रकार : दोन महिन्यांत दुसऱ्यांदा टक्कर
वृत्तसंस्था/ मनिला
दक्षिण चीन समुद्रात चीन आणि फिलिपाईन्सच्या जहाजांदरम्यान पुन्हा एकदा टक्कर झाली आहे. ही घटना सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजून 24 मिनिटांनी वादग्रस्त सेकंड थॉमस शोलनजीक घडली आहे. चीनच्या तटरक्षक दलाने सोशल मीडियावर याच्याशी निगडित एक व्हिडिओ शेअर केला आहे. चिनी तटरक्षक दलाचे जहाज 21551 ने फिलिपाईन्सचे जहाज 4410 ला अनेकदा इशारा परंतु त्या जहाजाने त्याकडे दुर्लक्ष करत टक्कर मारल्याचा दावा चीनकडून करण्यात आला.
फिलिपाईन्सच्या जहाजाने अत्यंत बेजबाबदार आणि धोकादायक पद्धतीने वर्तन केले आहे. फिलिपाईन्सचे जहाज जियाबिन रीफ (सबीना शोल) च्या जवळून अवैध स्वरुपात चिनी जलक्षेत्रात दाखल झाले होते असा आरोप चिनी तटरक्षक दलाचे प्रवक्ते गेंग यू यांनी केला.
फिलिपाईन्सच्या जहाजाने नियमांचा भंग केला आहे. पुढील काळात अशाप्रकारच्या चिथावणीयुक्त कृत्ये पुन्हा करण्यात आल्यास फिलिपाईन्सला परिणाम भोगावे लागतील असे चीनकडून म्हटले गेले.
चिनी जहाज आमच्या जलक्षेत्रात धोकादायक पद्धतीने युद्धाभ्यास करत होते. यादरम्यान फिलिपाईन्सच्या जहाजांना त्यांना टक्कर मारली, यामुळे आमच्या दोन जहाजांचे नुकसान झाल्याचा प्रतिआरोप फिलिपाईन्सकडून करण्यात आला.
फिलिपाईन्स आणि चीनच्या जहाजांची टक्कर यापूर्वी देखील झाली आहे. 17 जून रोजी दोन्ही देशांची जहाजं सेकंड थॉमस शोलनजीक परस्परांना भिडली होती. तेव्हा देखील दोन्ही देशांनी परस्परांना जबाबदार ठरविले होते. चीन आणि फिलिपाईन्स यांच्यात या भागात दीर्घकाळापासून तणाव जारी आहे. मागील वर्षी चीनच्या एका तटरक्षक जहाजाने फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाच्या जहाजाला टक्कर मारली होती.
सेकंड थॉमस शोलवर 6 देशांचा दावा
सेकंड थॉमस शोल दक्षिण चीन समुद्रात स्प्रॅटली आयलँड्समध्ये एक जलमग्न पर्वत आहे. यावर 6 देश स्वत:चा दावा सांगतात. सेकंड थॉमस शोल आमच्या समुद्र किनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैल आणि पलावल बेटापासून 140 किलोमीटर अंतरावर असल्याचे म्हणत फिलिपाईन्स हा भाग आमच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये येत असल्याचा दावा करतो. सेकंड थॉमस शोलवर दोन दशकांपासून फिलिपाईन्सने स्वत:च्या नौदलाचे जहाज बीआरपी सिएरा माद्रै तैनात केले आहे. तसेच त्याच्या नौसैनिकांची एक तुकडी तेथे तैनात आहे. चीनने या भागात नजर ठेवण्यासाठी स्वत:च्या अनेक बोट्स आणि तटरक्षक दलाच्या नौकांना तैनात केले आहे.









