अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारत आणि अमेरिका हे धोरणात्मक भागिदार देश असून ते लवकरच पुन्हा एकत्र होतील आणि त्यांच्यात व्यापार करारही होईल, असा विश्वास अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी व्यक्त केला आहे. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार शुल्कावरुन मोठा तणाव असला तरी, तो दूर होईल आणि दोन्ही देश पूर्वीप्रमाणेच एकमेकांशी सहकार्य करतील, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
भारत हे जगातील सर्वात मोठे गणतंत्रीय राष्ट्र आहे. तर अमेरिका ही जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. या दोन्ही देशांमध्ये कितीही मतभेद असले तरी शेवटी ते एकत्र येतीलच. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा आणि संपर्क सध्या जटील अवस्थेत आहे. संपर्क प्रक्रिया अधिकाधिक अवघड होत चालली आहे, अशी स्थिती असली तरी हे दोन देश एकमेकांपासून अधिक काळ दूर राहू शकणार नाहीत, असा आशावाद त्यांनी एका वृत्तसंस्थेकडे प्रकट केला.
अपेक्षेप्रमाणे नाही घडले
या उन्हाळ्याच्या प्रारंभापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील सर्व मतभेद दूर होतील आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होईल, अशी अमेरिकेची अपेक्षा होती. तथापि, भारताने रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची खरेदी न थांबविल्याने अमेरिकेचा अपेक्षाभंग झाला. खरेतर डोनाल्ड ट्रंप यांच्या सत्तारोहणानंतर भारतानेच प्रथम अमेरिकेशी व्यापार करार करण्याच्या दृष्टीने चर्चेचा प्रारंभ केला होता. इतर देशांशी अमेरिकेची चर्चा नंतर झाली. तथापि, इतर देशांशी व्यापार करार आधी झाला. भारताशी तो आजही झालेला नाही. काही संदर्भांमध्ये भारताची भूमिका आग्रही राहिली आहे, असेही प्रतिपादन बेसेंट यांनी यावेळी केले.
व्यापारी असमतोल महत्वाचा मुद्दा
अनेक देशांकडून अमेरिकेला होणारी निर्यात मोठी आहे आणि अमेरिकेकडून त्या देशांना होणारी निर्यात कमी आहे. त्यामुळे अमेरिका या देशांशी व्यापारी घाट्यात आहे. या स्थितीमुळे अमेरिकेने व्यापार शुल्काचे धोरण अवलंबिलेले आहे. अमेरिका व्यापारी समतोल साधू इच्छित आहे. भारताशीही अमेरिकेची व्यापारी तूट मोठी आहे. ती कमी करण्याची अमेरिकेची योजना आहे. त्यामुळे अमेरिकेने हे धोरण लागू केले. हा मुद्दा महत्वाचा आहे, अशी स्पष्टोक्ती बेसेंट यांनी केली,.









