‘आविष्कार उत्सव’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन : 5 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना पर्वणी
बेळगाव : ग्राहकांशी ठेवलेला संपर्क आणि उत्तम गुणवत्ता व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोणत्याही व्यवसायात आपण यशस्वी होतो. महिलांनी आता तंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्यवसाय वाढीसाठी करावा, असे मत जीआयटी कॉलेजचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर यांनी व्यक्त केले. आविष्कार महिला उद्योजक संस्थेतर्फे आयोजित ‘आविष्कार उत्सव’ प्रदर्शनाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. 5 नोव्हेंबरपर्यंत रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर ते बोलत होते. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. ते पुढे म्हणाले, महिलांना उद्योग करण्यासाठी आविष्कारने प्रदर्शनाचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. मागील 26 वर्षांमध्ये अनेक महिला उद्योजकांना व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास या प्रदर्शनातून मिळाला. पूर्वी शहरी भागात होणारी प्रदर्शने आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागली. महिलांनी या संधीचा फायदा घेऊन आपला उत्कर्ष करावा. प्रत्येक महिलेकडे आज स्मार्टफोन आहे. महिलांनी या स्मार्टफोनचा वापर मार्केटिंग मॅनेजर, अकौंटंट, सेक्रेटरी म्हणून करण्यास सुरुवात करायला हवी.
सर्व साहित्य एकाच छताखाली
दिवाळीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली आविष्कारने उपलब्ध करून दिले आहे. वस्त्रप्रावरणे, गृहोपयोगी वस्तू, मेणबत्त्या, डिझायनर ज्वेलरी, शोभेच्या वस्तू, आकाशकंदील याबरोबरच लोणचे, पापड, मालवणी सुकामेवा, लाडू, चकल्या, करंजी या ठिकाणी खरेदी करता येत आहेत. याबरोबरच प्रदर्शन पाहिल्यानंतर चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उत्सव उद्यापर्यंत सर्वांसाठी खुला
उद्घाटनाप्रसंगी बोलताना अध्यक्षा यशश्री देशपांडे म्हणाल्या, 26 वर्षांपूर्वी महिला उद्योजिका घडविण्यासाठी आविष्कारचा प्रवास सुरू झाला. ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर व कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या प्रमुख कांचनताई परुळेकर यांच्या प्रेरणेतून आविष्कार प्रदर्शन सुरू झाले. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने निरपेक्ष सेवा आणि वेळ काढत महिलांनी या प्रदर्शनाला बेळगावमध्ये वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सूत्रसंचालन रश्मी फडके यांनी केले. दुपारी 4 वाजता महिलांसाठी मेंदी रेखाटन स्पर्धा झाली. यावेळी आविष्कारच्या कार्यकारिणी सदस्या उपस्थित होत्या. सदर उत्सव रविवारपर्यंत सर्वांसाठी खुला आहे.









