बेळगाव : कर्नाटक युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टतर्फे दि. 9, 10 व 11 जून रोजी माध्यम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भवताल आणि माध्यम’ या विषयावर होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन 9 रोजी सकाळी 11 वा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहणार आहेत. विशेष निमंत्रित म्हणून पब्लिक टीव्हीचे संपादक एच. आर. रंगनाथ, श्रीलंका पर्यटन विभागाचे सदिच्छा दूत व क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनाही निमंत्रित केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भीमशी जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बेळगावमध्ये प्रथमच ही परिषद होत असून संजय घोडावत, श्रीलंकेचे भुवनेका हेराथ, चलाका गजाबाहु, संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तंगदूर व फेडरेशन ऑफ वर्किंग इंडियाचे जर्नालिस्टचे बी. व्ही. मल्लिकार्जुनय्या उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत साऊथ कोरियाच्या गीतिका तालुकदार, लंडनचे
पॅठुम, नेपाळच्या संजना पौडेल, कर्नाटकच्या डॉ. गीता किरण यांची व्याख्याने होणार आहेत. पाहुणे म्हणून श्रीलंकेचे उपुल जयसिंघे तर अध्यक्ष म्हणून बांगलादेशचे मोहम्मद शामेम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बेळगाव जिल्हा संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी दिली. याच परिषदेत निमंत्रणपत्रिका प्रकाशित करण्यात आली. ही परिषद सर्वभाषिक पत्रकारांसाठी खुली आहे. पत्रकारांसाठी संरक्षण, निवृत्त पत्रकारांच्या समस्या, त्यांना भेडसावणारे प्रश्न याबाबत परिषदेत चर्चा केली जाईल. मात्र, आसन व्यवस्था करणे सुकर व्हावे, यासाठी पत्रकारांनी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.









