सीईओ राहुल शिंदे : मतदानाचे महत्त्व पटवून द्या : जिल्हा स्वीप समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : लोकसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यामध्ये मतदार संघानुसार मतदानाचा टक्का वाढविला पाहिजे. याचबरोबर मतदारांमध्ये जागृती केली पाहिजे. तसेच स्वीप उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेले कार्यक्रम परिणामकारकरित्या रहावेत. यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे जिल्हा स्वीप समितीचे नोडल अधिकारी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले. जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील स्वीप समितीच्या बैठकीत ते बोलत होते. नागरिकांमध्ये मतदानाची जागृती करून मतदानाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप समितीकडून सातत्याने उपक्रम राबवून जागृती करणे आवश्यक आहे. गेल्या निवडणुकीत शहरामध्ये मतदानाचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा कमी झाले आहे. शहरी भागात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. जागृतीसाठी पथनाट्या, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. घरोघरी भेट देऊन मतदानाबाबत जागृती केली पाहिजे. गेल्या निवडणुकीत प्रामुख्याने शहरी भागातील कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राची नोंद घेऊन उपाय योजना राबविल्या पाहिजेत. स्वीप समितीच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविला पाहिजे, अशी सूचना मनपा आयुक्तांना त्यांनी केली.
कामांसाठी गेलेल्यांची नोंद घ्या
जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात कामासाठी गेलेल्या मतदारांची नोंद घेऊन त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजेत. पात्र मतदारांनी मतदान केंद्रांवर येवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पात्रताधारक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे. जिल्ह्यातील कामगारांची नोंद घेऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी मतदाना व्यतिरिक्त काही नाही, मी निश्चित मतदान करणार, या घोषवाक्याखाली मतदान जागृती करण्यात यावी, असे अधिकाऱ्यांना राहुल शिंदे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायतचे योजना अधिकारी डॉ. कृष्णराज, लेखाधिकारी गंगा हिरेमठ, नगर विकास खात्याचे योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, अल्पसंख्यांक कल्याणाधिकारी डॉ. अब्दुल रशीद, आयुष खात्याचे श्रीकांत, डीडीपीयु एम. एम. कांबळेसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.









