आम आदमी पक्षाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मच्छे व पिरनवाडी पंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र स्थापनेपासून आजतागायत येथे निवडणुका झाल्या नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पंचायतींमध्ये नियुक्त केलेले अधिकारी आपल्या मनमानीप्रमाणे काम करत असल्याने नागरिकांच्या अडचडणीत भर पडली असून लोकसंख्या व विकासाच्या दृष्टीने लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. राज्य सरकराने मच्छे व पिरनवाडी पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत नगरपंचायतीसाठी निवडणूक झालेली नाही. तेथे लोकप्रतिनिधी कार्यरत नसल्याने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून नागरिकांच्या कामाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, परिणामी त्यांची गैरसोय होत आहे. तसेच विकासकामांकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहेत. यामुळे त्यांना बळकट करण्याची गरज असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व विकासकांमाना गती देण्याची आवश्यकता आहे. यासाठी मच्छे व पिरनवाडी नगरपंचायतींसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी विजय पाटील, अस्लम तहसीलदार, बशीर जमादार, नागेश यरगट्टी, शब्बीनअली मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









