भारतीय किसान संघाची माहिती : कृषी सहसंचालकांना देण्यात आले निवेदन
बेळगाव : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीकहानी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट आले आहे. याची दखल घेऊन शासनाकडून कृषी खात्यामार्फत सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे करत असताना कर्मचाऱ्यांकडून चुकीची माहिती अपलोड करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून जिल्ह्यात होणाऱ्या पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणावी, अशी मागणी भारतीय किसान संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोलेकर यांना देण्यात आले. पीक विमा योजनेतंर्गत एंजटांचा प्रभाव वाढला आहे. पीक विमा भरून घेतल्यानंतर मिळणाऱ्या विमा भरपाईमध्ये 50:50 याप्रमाणात पैसे घेत आहेत.
याचीही गांभीर्याने दखल घ्यावी पीक विमा भरपाईमध्ये अनियमितता आढळून येत असून याला सर्वस्वी विभागातील अधिकारीच जबाबदार आहेत. यासाठी वेळीच त्यांना सक्त सूचना देऊन नियमीतता आणावी. विमा कंपन्यावर एजंटांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी. पीक विमा कंपन्यांचा टोलफ्री क्रमांक योग्यरित्या काम करत नसल्याने शेतकऱ्यांना माहिती मिळणे अवघवड झाले आहे. यासाठी प्रत्येक ग्रा. पं. स्तरावर पर्जन्यमान मोजमाप करून तालुका अधिकाऱ्यांनी त्यांचे निरीक्षण करावे. पीक नुकसानीबाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांना पंचायतीद्वारे माहिती देण्यात यावी. सर्वेक्षणावेळी अधिकारी अनेक ठिकाणी शेतात घेतलेली पिके वेगळी असतात आणि सर्वेक्षणात वेगळी पिके नोंद करत आहेत. यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम पारदर्शकपणे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.









