राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांची मागणी
विटा प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सभा नागरीकांना खुली आहे. गटविकास अधिकारी तथा प्रशासक यांनी दरमहा सर्व विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठक निश्चीत करावी. या सभेला उपस्थित राहणेसाठी नागरीकांना जाहिर सूचना देण्यात यावी. त्यामुळे तालुक्यातील आम जनतेला समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांना देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, ॲड.संदीप मुळीक, शहर कार्याध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.
याबाबत ॲड.बाबासाहेब मुळीक यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, खानापूर तालुका पंचायत समिती सदस्यांची मुदत १४ मार्च २०१२ मध्ये संपलेली आहे. सध्या पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी यांची नियुक्ती आहे. पंचायत समितीचा कारभार सदस्यांमार्फत चालावा असे कायद्याला अभिप्रेत आहे. परंतु न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे पंचायत समितीच्या निवडणूका अनिश्चीत काळासाठी पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे प्रभावीपणे निरसन होत नाही.
नियमानुसार पंचायत समितीची दर महिन्यातून एकदा सभा घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या सभापतीच्या अध्यक्षतेखाली दरमहा सभा होत होती. त्यामध्ये पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख या सभेमध्ये हजर रहात होते. पंचायत समितीचे सदस्य नागरीकांच्या संबंधीत विभागाच्या समस्या सभेपुढे मांडून त्याचे निराकरण करीत होते. परंतु पंचायत समितीवर प्रशासक असलेने अशी सभा होत नाही. त्यामुळे जनतेच्या समस्यांचे निरसन होण्यात अडचण निर्माण झाली आहे, असे अँङ मुळीक यांनी म्हंटले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सभा नागरीकांना खुली आहे. गटविकास अधिकारी तथा प्रशासक यांनी पंचायत समितीची दरमहा आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, महिला बालकल्याण, समाजकल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता इत्यादी विभागाच्या प्रमुखांची एक आढावा बैठक महिन्याच्या एका विशिष्ठ तारखेला निश्चीत करून या सभेला उपस्थित राहणेसाठी नागरीकांना जाहिर सूचना देण्यात यावी. त्यामुळे तालुक्यातील आम जनतेला समस्या मांडण्यासाठी आणि सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असे राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.