फसवणूक करुन आयता लाभ पदरी पाडून घेण्यासाठी कोण कोणती युक्ती शोधेल किंवा शक्कल लढवेल हे सांगता येणे निव्वळ अशक्य आहे. कल्पनातीत असे मार्ग यासाठी शोधले जातात. चीनमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कंडोम (निरोध), केसांचे पुंजके, मेलेले झुरळ आदींचा उपयोग करुन चक्क 63 हॉटेलांमध्ये विनामूल्य वास्तव्य केले. तथापि, अखेर त्याचे हे बिंग बाहेर पडले. या व्यक्तीचे नाव सरनेस झियांग असल्याची माहिती देण्यात आली.
झियांग हा अवघ्या 21 वर्षांचा आहे. त्याला महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता होती. प्रवेशानंतर आपल्याला शिष्यवृत्ती मिळेल अशीही त्याची अपेक्षा होती. तथापि, त्याची इच्छा फोल ठरली. त्यानंतर त्याने या फसवणुकीच्या धंद्याला प्रारंभ केला. यासाठी त्याने एक अद्भूत युक्ती शोधली. तो प्रथम कोणत्यातरी प्रसिद्ध आणि मोठ्या हॉटेलात येत असे. तेथील खोली घेत असे. आपल्यासवमेत काही सामानही नेत असे. या समानात उपयोगात आणलेले कंडोम, केसांचे पुंजके आणि मेलेले झुरळ इत्यादी सामग्री असे. ही सामग्री हॉटेलच्या खोलीत कोपऱ्यांमध्ये किंवा पटकन् दिसणार नाही, अशा जागी टाकून तो आपला थयथयाट सुरु करीत असे. हॉटेलच्या व्यवस्थापकाशी वाद घालत असे. आपल्या हॉटेलची ख्याती ऐकून मी येथे खोली घेतली. पण इथे इतकी अस्वच्छता असेल असे वाटले नव्हते. इत्यादी बतावणी करुन तो व्यवस्थापकावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असे.
असा प्रयोग त्याने दोन वर्षांपेक्षा काहीशा जास्त कालावधीत साधारणत: 300 हॉटेलांवर केला. त्यांच्यापैकी प्रत्येक हॉटेलात त्याची डाळ शिजत असे असे मुळीच नाही. कित्येक हॉटेल व्यवस्थापक त्याच्या या नौंटकीला दाद देत नसत. असा खमक्या व्यवस्थापक भेटला की तो हळूच बिल भरुन काढता पाय घेत असे. तथापि, 63 हॉटेलांमध्ये त्याची ही युक्ती यशस्वी ठरली. या हॉटेलांमध्ये मन मानेल तिकके दिवस राहिला. नंतर अस्वच्छतेचे कारण पुढे केले. त्याच्या या दबाव तंत्राला या 63 हॉटेलांचे व्यवस्थापक बळी पडले. हॉटेलची बदनामी नको म्हणून यांनी त्याचे बिल माफ केले. अशा प्रकारे या हॉटेलांमध्ये त्याने एक पै न खर्च करता वास्तव्य केले. मात्र, कोणतेही तंत्र सदासर्वकाळ चालत नाही. आता त्याची ही युक्ती बाहेर पडली असून त्याला अटक करण्यात आली असल्याचे समजते.









