बाणस्तारी अपघात प्रकरण
प्रतिनिधी / पणजी
बाणस्तारी पुलावर तीन जणांचा बळी घेणाऱ्या भीषण अपघात प्रकरणातील संशयित कारचालक परेश सिनाय सावर्डेकर याला काल गुरुवारी उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या या अपघातात दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल परेशला अटक करण्यात आली होती.
जामीन देताना न्यायालयाने म्हटले आहे की, तपास संपला असल्याने परेशला आणखी कोठडीची आवश्यकता नाही. परेशला आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. अपघातावेळी परेशच कार चालवत होता, हे पुराव्यांवरून तपासले आहे, असे गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले, अशी माहिती सरकारी वकील शैलेंद्र भोबे यांनी दिली.
एक लाख रूपयांच्या हमीवर आणि तेवढ्याच रकमेवर परेशची सुटका करण्यात आली आहे. सुटकेनंतरच्या पहिल्या आठवड्यात त्याने दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 पोलीस स्थानकात हजेरी लावावी. त्यानंतर पुढे जेव्हा बोलावले जाईल तेव्हा तपास अधिकाऱ्यांकडे यावे. त्यांनी मागितलेला अहवाल द्यावा. गोवा सोडू नये, पासपोर्टची माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
गुंतागुंतीमुळे प्रकरण सीआयडीकडे
या अपघातप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी ढिसाळ तपास केल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. अपघाताच्या रात्री परेशच्यासोबत तीन मुलांसह पत्नी मेघना सावर्डेकरही होती. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कार मेघना चालवत होती. अपघातानंतर मेघनाने ड्रायव्हिंग सीट सोडली. अपघातावेळी पती–पत्नी दोघेही दारूच्या नशेत होते, असाही दावा करण्यात आला होता. नंतर चाचणीत परेश दारु प्याल्याचे स्पष्ट झाले होते. एकूणच गुंता वाढत गेल्याने हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले आहे. आता नऊजणांची खास टीम याबाबत तपास करत आहे.
उच्च न्यायालयाचा बुधवारचा आदेश
बुधवारी उच्च न्यायालयाने बाणास्तारी अपघातप्रकरणी संशयित सावर्डेकर दाम्पत्याने दोन आठवड्यांच्या आत उच्च न्यायालयात दोन कोटी ऊपये जमा करावेत, असा आदेश दिला आहे. या रकमेचे पीडितांच्या कुटुंबांना वाटप केले जाईल. मृतांपैकी दिवाडी येथील फडते दाम्पत्याच्या कुटुंबीयांना, तिसरा मयत अऊप कर्माकर याच्या कुटुंबाला तसेच तीन जखमींना पैसे दिले जाईल. पीडितांना ही सानुग्रह भरपाई लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, असे उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना सांगितले आहे.