फ्रूट मार्केटमध्येही पडले खड्डे : तातडीने दुरुस्तीची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
न्यू गांधीनगर येथे असलेल्या सर्व्हिस रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या सर्व्हिस रस्त्यावरून वाहने चालविणे कसरतीचे ठरत आहे. तर तेथे असलेल्या फ्रूट मार्केटमधील रस्त्यांनाही खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व व्यापारीवर्गातून होत आहे.
न्यू गांधीनगर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर मोठमोठे ख•s पडले आहेत. त्यामुळे या सर्व्हिस रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड जात आहे. बेळगावमध्ये प्रवेश केल्यानंतर वाहनचालकांचे ख•dयांनीच स्वागत होत आहे. त्यामुळे बेळगाव हे खड्डयांचे शहर आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस रस्ता करण्यात आला होता. त्याचबरोबर न्यू गांधीनगरला ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गही करण्यात आला आहे. त्याठिकाणीही पावसाळ्यात पाणी साचून राहत आहे. त्यानंतर किल्ला तलावापर्यंत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे या सर्व्हिस रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे.
याच रस्त्याला लागून फ्रूट मार्केट आहे. फ्रूट मार्केटमध्येही खड्डे पडले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये ही समस्या गंभीर बनत चालली असून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









