संतापलेले नागरिक घुसले कक्षात : संगणक पाडले खाली
बेळगाव : महापालिकेच्या जन्म आणि मृत्यू दाखले विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दाखले वेळेत मिळत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी थेट जन्म-मृत्यू दाखले विभागात घुसून तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरत संगणक व इतर साहित्याचे नुकसान केले आहे. शुक्रवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान हा प्रकार घडला असून जन्म व मृत्यू दाखले विभागातील कारभारात आतातरी सुधारणा होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीतील दवाखान्यांमध्ये जन्म झालेल्या बालकांचे जन्मदाखले तसेच मृत्यू झालेल्यांचे मरण उतारे महानगरपालिकेकडून दिले जातात. त्यासाठी वेगळ्या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आलेल्या अर्जांचा स्वीकार केल्यानंतर आरोग्य अधिकारी व मनपा आयुक्त डिजिटल सही झालेले अर्ज संबंधितांना वितरित केले जातात. त्याचबरोबर नावातील बदल व दुरुस्ती करून देण्यासाठीही वेगळा विभाग कार्यरत आहे.
सध्या या विभागातील काही अधिकाऱ्यांची व्यापार परवाना विभागात नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली असून उपलब्ध मनुष्यबळावरच जन्म-मृत्यू दाखले विभागाचा कारभार सुरू आहे. दररोज दुपारी 2 च्या दरम्यान जेवणाच्या सुटीसाठी जन्म-मृत्यू दाखले विभाग बंद केला जातो. मात्र, सर्वसामान्य नागरिक दाखले मिळविण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत जन्म-मृत्यू दाखले विभागाबाहेर रांगेत थांबलेले असतात. त्यांचे अर्ज वेळेत स्वीकारण्यासह दाखले वेळेत मिळत नसल्याची ओरड आहे.
काही नगरसेवक व एजंट थेट जन्म-मृत्यू दाखले विभागात प्रवेश करून आपली कामे करून घेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. शुक्रवारी अडीचच्या दरम्यान जन्म-दाखले मृत्यू विभाग बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न चालवले होते. त्यामुळे दिवसभर रांगेत थांबलेल्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. थेट आत गेलेल्यांना दाखले मिळत आहेत, पण रांगेत थांबलेल्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप करत संतापलेल्या नागरिकांनी जन्म-मृत्यू दाखले विभागातील संगणक व इतर साहित्याचे नुकसान केले.









