नागरिकांतून तीव्र संताप : सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी
वार्ताहर /धामणे
धामणे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या नाल्याचे दुतर्फा काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत पडून राहिले असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावच्या मध्यभागातून पूर्वीपासून नाला आहे. या नाल्याला गावच्या सर्व गटारी जोडल्या आहेत. त्यामुळे या गटारींचे सांडपाणी या नाल्यातून जाते. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य होऊन या नाल्याशेजारील कलमेश्वर गल्ली, मारुती गल्ली आणि बसवाण गल्ली व शहापूर गल्लीच्या काही भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी मागीलवर्षी शासनाकडून या नाल्याची खोदाई करून नाल्याच्या दुतर्फा आरसीसी भिंत उभारण्यासाठी 5 कोटी मंजूर झाले होते. नाल्याचे काम मागील 7 महिन्यापासून सुरू होते. परंतु नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपासून हे काम बंद आहे. नाल्याच्या दुतर्फा असलेल्या भिंती काही ठिकाणी अजून अर्धवट स्थितीत पडून आहेत. गावच्या मध्यभागातून हा नाला जात असून 8 ठिकाणी नाल्यावर पूल आहेत. नालाखोदाई केला. परंतु पूल कमकुवत झाल्याने पुलामध्ये कचरा अडकून सांडपाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे.









