केंद्र 4 ते 5 दिवस असणार बंद : पर्यायी जागेत व्यापाराची मुभा
बेळगाव : शहरातील अशोकनगर मार्गावर असलेले फूल लिलाव केंद्रात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. यासाठी गुरुवारपासून 4 ते 5 दिवस काही प्रमाणात बंद करण्यात आले आहे. केंद्रात काँक्रिटीकरण करण्यात येत असून स्टॉल्सची संख्या वाढविण्यात येत आहे. यासाठी काही प्रमाणात केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. विकासकामे सुरू असली पर्यायी जागेत व्यापाऱ्यांना व्यवहार चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
शहरातील फूल लिलाव केंद्र हे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. केंद्रात दररोज विविध प्रकारांची फुले विक्रीसाठी येत असतात. पण केंद्रात मूलभूत सुविधा नसल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत होता. तसेच त्यांना देवाणघेवाण करणे मुश्कील बनत होते. केंद्रात रस्ते, आसन व्यवस्था, पाण्याची सुविधा आदींचा वानवा होती. याची दखल घेऊन बागायत खात्याने केंद्रात विविध विकासकामे हाती घेतली आहेत.
पावसाळ्यात केंद्रात चिखलाचे साम्राज्य बनत होते. यामुळे व्यापार करणे अवघड बनत होते. तसेच चिखलातच शेतकरी व व्यापाऱ्यांना व्यवहार करावे लागत होते. यापूर्वीच केंद्रातील अर्ध्या भागाचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. आता उर्वरित संपूर्ण केंद्राचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून स्टॉल्सची संख्याही वाढविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना सोईचे होणार असून विनाअडचणी व्यवहार करणे सोपे होणार आहे. केंद्रात करण्यात येत असलेल्या विकासकामांमुळे 4 ते 5 दिवस केंद्र बंद ठेवले असले तरी पर्यायी जागेत व्यापार करण्याची मुभा देण्यात आली आहे.









