कालव्याच्या पाहणीनंतर खासदार जगदीश शेट्टर यांचे आश्वासन
सांबरा/वार्ताहर
मुतगे शिवारातील कालव्याचे पावसाळ्यानंतर काँक्रिटीकरण करून देण्याचे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले. शनिवारी मुतगे गावाला भेट देऊन कालव्याची पाहणी केल्यानंतर खासदार शेट्टर यांनी शेतकऱ्यांना कालव्याचे काँक्रीटीकरण करून देण्याचे आश्वासन दिले.
बसरीकट्टी शिंदोळी भागातून मुतगे हद्दीमध्ये एक कालवा आलेला आहे. याच कालव्याने पावसाळ्यामध्ये गावातील सर्व तलावे तुडुंब भरतात. मात्र सदर कालवा दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी कालव्याचा बांध बांधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी कालव्याचे काँक्रिटीकरण करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली होती. त्यानुसार खासदार शेट्टर यांनी शनिवारी मुतगे गावाला भेट देऊन कालव्याची पाहणी केली व लवकरच कालव्याचे काँक्रिटीकरण करून देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.
सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतर असलेल्या कालव्याचे कायमस्वरूपी काँक्रिटीकरण झाल्यास दरवर्षी पावसाळ्यात याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असून तलावे तुडुंब भरणार आहेत. लवकरच कालव्याचे काँक्रिटीकरणाचे काम होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
खासदार जगदीश शेट्टर यांच्यासमवेत माजी आमदार संजय पाटील, भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश पुरी, ग्रा. पं. अध्यक्षा मीरा देशपांडे, चेतन आंगडी, ग्रा. पं. सदस्य किरण पाटील, भालचंद्र पाटीलसह हेमंत पाटील, भाऊ पाटील, शामराव पाटील, सचिन पाटीलसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









