विकासकामांसाठी खोदाई : सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची दुर्दशा
बेळगाव : शहरात विकासकामांसाठी खोदाई केली जात आहे. त्यामुळे सुसज्ज रस्त्यांची यामध्ये वाट लागत आहे. जलवाहिनी, ड्रेनेज पाईपलाईन, गटारी आणि इतर कामांसाठी खोदाई केली जात आहे. त्यामुळे नवीनच असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांचे तीनतेरा वाजू लागले आहेत. त्यामुळे रस्त्यांसाठी खर्ची घातलेल्या लाखो रुपयांचाही चुराडा होत आहे. याकडे स्मार्ट सिटी आणि मनपा प्रशासन गांभीर्याने बघणार का? हेच आता पहावे लागणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची घातला आहे. याअंतर्गत काँक्रीटचे रस्ते, गटारी, ड्रेनेजलाईन, जलवाहिनी आणि इतर कामे करण्यात आली आहेत. या कामांच्या खोदाईसाठी सुसज्ज स्थितीत असलेल्या काँक्रीट रस्त्यांची वाट लागत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे रस्ते करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणे, अन् दुसरीकडे इतर विकासकामांसाठी याच रस्त्यांची खोदाई करणे, असे प्रकार सर्रास पहावयास मिळत आहेत. त्यामुळे रस्त्यांसाठी खर्च केलेला पैसाही पाण्यात जावू लागला आहे.
शहरातील कॉलेज रोड, यंदे खूंट, रेल्वेस्टेशन, अशोकनगर आणि इतर ठिकाणीही सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. इतर कामांचा विकास साधण्यासाठी रस्त्यांची मात्र दुर्दशा होऊ लागली आहे. शहरातील आरपीडी क्रॉस, क्लब रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, चन्नम्मा सर्कल, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, एसपी ऑफीस रोड, नेहरुनगर, रामतीर्थनगर आदी ठिकाणी काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्त्याशेजारी फुटपाथ आणि सायकल ट्रॅकची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र देखभालीअभावी फुटपाथवर व्यावसायिक आणि वाहनांचे अतिक्रमण होत आहे. शहरातील सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर खोदकामाच्या नावाखाली तोडफोड केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. पाणीगळती, ड्रेनेजगळती आणि इतर समस्या मार्गी लावण्यासाठी रस्त्यांची खोदाई होऊ लागली आहे. यामध्ये सुस्थितीत असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांची वाट लागत आहे. मनपा प्रशासन आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी काँक्रीटच्या रस्त्यांची खोदाई थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
परवानगी न घेता काम केल्यास कारवाई करणार
शहरातील विविध विकासकामांसाठी रस्ता खोदण्यापूर्वीच संबंधितांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेता काम केल्यास कारवाई केली जाणार आहे.
– राजश्री जैनापुरे, मनपा प्रभारी आयुक्त









