नऊ दिवस चाललेल्या उत्सवावेळी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा घेतला लाभ
वार्ताहर/सांबरा
शिंदोळी (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची बुधवार दि. 30 रोजी सांगता झाली. नऊ दिवस चाललेल्या यात्रा उत्सवामध्ये हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. बुधवारी सायंकाळी गदगेसमोर धार्मिक विधी झाल्यानंतर महालक्ष्मी देवीच्या व्हन्नाट खेळाला प्रारंभ झाला. यावेळी देवीचा जयजयकार करत भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती. गावामध्ये प्रमुख मार्गावर देवीचा व्हन्नाट खेळ सुरू होता. देवीचा खेळ पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर देवीचे सीमेकडे प्रस्थान झाले व यात्रोत्सवाची सांगता झाली. गेल्या नऊ दिवसांमध्ये यात्रोत्सवाला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहकुटुंब भेट देऊन दर्शन घेतले. चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, आमदार रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आदीनींही भेट दिली. रथोत्सव, देवीची मिरवणूक, जंगी कुस्त्या, महिलांच्या कुस्त्या यांसह मनोरंजनाचे कार्यक्रम यात्राकाळात झाले.









