प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे एक दिवस आधीच गुरुवारी सूप वाजणार आहे. बुधवारी सायंकाळी सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी काही कारणामुळे गुरुवारी अधिवेशन आटोपते घेण्यात येत असल्याची घोषणा केली. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. प्रश्नोत्तरानंतर पुरवणी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. सायंकाळी अधिवेशनाचा शेवट होणार आहे.
काँग्रेसच्या प्रियांक खर्गे यांनी याला आक्षेप घेतला. अधिवेशन एक दिवस आधी आटोपते घेतला तर चर्चेला वेळ कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी एक दिवस आधी अधिवेशन संपविणार असाल तर चर्चेला गुरुवारी अधिक वेळ द्या, अशी मागणी केली. सभाध्यक्षांनी ते मान्य केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तीन दिवसांचा कर्नाटक दौरा जाहीर झाला आहे. गुरुवारी ते कर्नाटकात येत आहेत. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे. तर काँग्रेसनेही विजापूरला अनुसूचित जाती-जमातींचा मेळावा भरविला आहे. या सर्व कारणांमुळे एक दिवस आधी अधिवेशन आटोपते घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ठरल्याप्रमाणे शुक्रवार दि. 30 डिसेंबर रोजी अधिवेशनाची शेवटची तारीख होती.









