सांगता समारंभात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसह पोलीस अधिकारी.
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले असून शुक्रवारी पोलीस मुख्यालयात या उपक्रमाचा समारोप झाला.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पोलीसप्रमुखांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
एनसीसीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी संपूर्ण माहिती देऊन पोलिसांचे कामकाज कसे चालते, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोणती जबाबदारी पार पाडावी लागते, गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आदीविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील 29 शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.









