पारदर्शकता वाढवण्याबाबत एकमत : ऑडिटिंग’ तत्त्वांच्या विकासावर भर
पणजी : भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील साई 20 प्रतिबद्धता गटाच्या साई 20 शिखर परिषदेचा काल मंगळवारी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलात समारोप झाला. दोन दिवसांच्या या परिषदेदरम्यान ‘ब्लू इकॉनॉमी’च्या विविध पैलूंबद्दल त्यांचे मौल्यवान ज्ञान आणि अनुभव यांचे आदानप्रदान करण्यात आले. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) आणि सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था-20 (साई20) एंगेजमेंट ग्रुपचे अध्यक्ष गिरीशचंद्र मुर्मू उपस्थित होते. यावेळी बोलताना मुर्मू यांनी सजीव चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण, साई 20 आदेशाप्रती असलेली वचनबद्धता आणि एका चांगल्या जगाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न
‘ब्लू इकॉनॉमी’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या नवीन युगाच्या क्षेत्रांच्या इष्टतम परिपक्वतेमध्ये कार्यक्षमता, जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवण्याचा एकत्रित मार्ग तयार केला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. साईच्या सुशासनामध्ये प्रभावी भूमिका ओळखून, साई 20 सदस्यांनी जी 20 संरचनेत एक वेगळा, स्वतंत्र, संस्थात्मक मार्ग म्हणून विचारविनिमय केल्याचेही मुर्मू यांनी सांगितले.
‘ऑडिटिंग’ तत्त्वांच्या विकासावर भर
समारोप सत्रानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मूर्मु यांनी या दोन दिवसीय शिखर परिषदेदरम्यान साई20 ने जी20 देशांच्या साईसाठी कृतीकेंद्रित मंचाचे प्रतिनिधित्व केल्याचे सांगितले. त्याद्वारे सर्वोत्कृष्ट पद्धती, क्षमता निर्मिती आणि योग्य ऑडिटिंग मार्गदर्शक तत्त्वांचा विकास आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांचे ऑडिट करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आल्याचेही सांगितले. या परिषदेसाठी जी20 सदस्य साईमधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग होता. त्यात भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कोरिया, इंडोनेशिया, रशिया, सौदी अरेबिया, तुर्किये, बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, स्पेन, मोरोक्को, पोलंड, यांचा समावेश होता.