परस्परांवर रंग उधळत केला एकच जल्लोष
बेळगाव : पीयूसी द्वितीय परीक्षेची गुरुवारी सांगता झाली. गुरुवारी हिंदी विषयाचा शेवटचा पेपर झाला आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची दिशा ठरविण्याच्यादृष्टीने बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 1 मार्चपासून ही परीक्षा सुरू झाली होती. गुरुवारी हिंदी विषयाचा पेपर झाला आणि विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा केंद्राबाहेरच रंगोत्सव साजरा केला. वर्षभराचा अभ्यास, परीक्षेचे टेन्शन, विविध विषयांच्या शिकवण्या यामुळे त्यांच्या छंदांवर मर्यादा आल्या होत्या. रंगोत्सव त्यांना खेळता आला नव्हता. त्यामुळे गुरुवारी परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण केली. परीक्षेला येतानाच त्यांनी आपल्या बॅगमधून आणलेले रंग घेऊन परस्परांवर उधळण केली आणि एकच जल्लोष केला. त्याचबरोबर सुटीमध्ये भेटण्याचे विविध मनसुबेही रचत त्यांनी परस्परांचा निरोप घेतला.









