आजपासून शिष्यांचा संगीत कार्यक्रम : आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गायकांचा सहभाग : लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावचे गायक पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता या महिन्यात होत आहे. यानिमित्त दि. 28 ते 30 ऑक्टोबरदरम्यान लोकमान्य रंगमंदिर येथे विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शास्त्रीय संगीत, भजन, लघु संगीत आदींचे सादरीकरण बुवांचे शिष्य करणार असून ‘तेथे कर आमुचे जुळती’ हा नाटय़ाविष्कार होणार आहे, अशी माहिती गायक राजप्रभू धोत्रे यांनी दिली.
जिव्हेश्वर मंदिर, वडगाव येथे बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, बेळगावच्या इतिहासात शास्त्रीय संगीत परंपरा पुढे चालावी, यासाठी बुवांनी परिश्रम घेतले. सर्व प्रकारचे संगीत त्यांनी शिष्यांना दिले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून शिष्यवृंदाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक तसेच पुणे, मुंबई, भोपाळ, बेंगळूर, देवगुरु येथील गायक सहभागी होणार आहेत. कडलास्कर बुवा यांचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना भजनाचे उत्तम अंग होते. त्यांची भजन ही पर्वणी असायची. त्यांचे शिष्यवृंद दरवषी त्यांच्या स्मृतिदिनी बेळगावला येऊन कार्यक्रम करीत असत, असे त्यांनी सांगितले.
तिन्हीही दिवस कार्यक्रम विनामूल्य
यंदाचे वर्ष बुवांचे जन्मशताद्बी असून तीन दिवस विशेष कार्यक्रम होणार आहेत. दि. 28 रोजी नाटय़ाविष्कार व नाटय़गीते सादर होणार आहेत. त्याची संकल्पना राजप्रभू धोत्रे यांची असून मार्गदर्शन महेश कुलकर्णी यांचे आहे. तिन्हीही दिवस होणारे कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन राजप्रभू धोत्रे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला महेश कुलकर्णी व अन्य उपस्थित होते.









