पर्यावरणप्रेमींचा प्रतिसाद : विद्यार्थ्यांनीही दिली प्रदर्शनाला भेट
बेळगाव : बागायत खाते, जिल्हा पंचायत आणि बेळगाव फलोत्पादन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या फल-पुष्प प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात विविध रंगीबेरंगी रोपटी, फळे, भाजीपाला आणि फळा-फुलांमध्ये साकारलेल्या प्रतिकृती आकर्षण ठरल्या. बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खात्यामार्फत दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते. एकाच छताखाली विविध जातींची रोपे, फळे, फुले आणि भाजीपाला पाहावयास मिळतो. त्याबरोबरच सेंद्रीय शेतीची माहिती या ठिकाणी दिली जाते. या प्रदर्शनात विशेषत: फुलांपासून राणी चन्नम्मा घरकुल आणि कमल बस्ती व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अलीकडे घरच्या घरी बाग फुलविणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे, अशा पर्यावरणप्रेमींसाठी हे प्रदर्शन लाभदायी ठरले आहे. विशेषत: खालच्या वर्गातील शैक्षणिक सहलींचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या प्रदर्शनाचा आनंद लुटता आला.









