प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्हचा लाभ मिळण्याची शक्यता
लवकरच मांडल्या जाणाऱया अर्थसंकल्पात केंद्र सरकार एमएसएमई (सुक्ष्म, लघू अन् मध्यम उद्योग) क्षेत्राला प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह (पीएलआय) योजनेचा लाभ देण्याची घोषणा करू शकते. मागील 2-3 वर्षांमध्ये सरकारने 14 उद्योगक्षेत्रांसाठी पीएलआय योजनेची घोषणा केली आहे. पुढील 5 वर्षांमध्ये या क्षेत्राला पीएलआय योजनेच्या अंतर्गत 1.97 लाख कोटी रुपयांचा प्रोत्साहननिधी दिला जाणार आहे. परंतु पीएलआय योजनेत एमएसएमई क्षेत्र थेट स्वरुपात सामील होऊ शकत नाही, प्रत्यक्षात देशाच्या निर्यातीत एमएसएमईचे योगदान 40 टक्क्यांहून अधिक आहे, तर जीडीपीत एमएसएमईचे योगदान 25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
दोन प्रकारे मिळू शकतो लाभ
सूत्रांनुसार सरकार दोन प्रकारे एमएसएमईला पीएलआय योजनेचा लाभ मिळवून देऊ शकते. पीएलआय योजनेसाठी गुंतवणुकीची मर्यादा रक्कम कमी करण्याचा पहिला प्रकार ठरू शकतो. एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रक्कम गुंतवून उत्पादन आणि निर्यातीत इन्क्रीमेंटल वृद्धी केली तरच पीएलआय योजनेचा लाभ मिळू शकतो. सर्व क्षेत्रांसाठी गुंतवणूक मर्यादेची रक्कम वेगवेगळी आहे. बहुतांश क्षेत्रांमध्ये ही मर्यादा 100 कोटीहून अधिक आहे. एमएसएमई क्षेत्र मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाही, याचमुळे पीएलआय योजनेचा लाभ कॉर्पोरेट किंवा मोठे उद्योगसमूह घेत आहेत. पीएलआय नियमात बदल करत एमएसएमईला सामील करण्यासाठी संयुक्त स्वरुपात गुंतवणुकीची अनुमती दिली जाऊ शकते.
गुंतवणुकीची मर्यादा ठरणार
सूत्रांनुसार अर्थसंकल्पात नव्या क्षेत्राला पीएलआय योजनेत सामील करण्याची घोषणा होऊ शकते आणि या क्षेत्रात एमएसएमईला विचारात घेत गुंतवणुकीची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. विविध एमएसएमई संघटनांनी सरकारकडे एमएसएमईसाठी सर्व्हिस लिंक्ड इन्सेटिव्ह योजना लागू करण्याची मागणी केली आहे. सेवाक्षेत्राची निर्यात यातून वाढविता येणार असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.
औद्योगिक पायाभूत सुविधा
फेडरेशन ऑफ स्मॉल, मीडियम एंटरप्रायझेसनुसार अर्थसंकल्पात औद्योगिक मूलभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी निधीची घोषणा केली जाऊ शकते. फिस्मेनुसार सध्या देशात शेकडो ठिकाणी औद्योगिक क्षेत्रे आहेत, परंतु तेथील रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांची स्थिती अत्यंत खराब असल्याने उद्योजकांनी स्वतःचे कामकाज अन्यत्र हलविले आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणल्यास उद्योजक पुन्हा मूळ ठिकाणी उत्पादन सुरू करू शकतात.









