दीड वर्षांत साडेचारशेहून अधिक महिलांचा छळ
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांतील आकडेवारी लक्षात घेता कौटुंबिक हिंसाचारात वाढ होत असल्याचे दिसून येते. यामुळे साहजीकच नागरी समाजाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात साडेचारशेहून अधिक महिलांवर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. हुंड्यासाठी छळाच्या घटनाही वाढत्याच आहेत. कौटुंबिक कलह, क्षुल्लक कारणावरून दाम्पत्यात होणारी भांडणे, मालमत्तेवरून उद्भवणारे वाद आदी कारणांमुळे महिलांवरील हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. उपलब्ध माहितीवरून जिल्ह्यात पतीकडून विवाहित महिलेला जाच दिल्याच्या घटना सुमारे दीडशेच्या घरात घडल्या आहेत.
तर इतर प्रकारच्या त्रासाच्या 260 हून अधिक घटना घडल्या असून हुंड्यासाठी जाच या कायद्याखाली 17 गुन्हे दाखल झाले आहेत. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दिलेल्या जाचामुळे चार महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.मालमत्तेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेले भांडण, भांडणानंतर होणारी हाणामारी, हाणामारीत महिलांवर हल्ल्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. कौटुंबिक व मालमत्तेच्या कारणावरून होणाऱ्या हाणामारीत महिलांचे जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. खासकरून ग्रामीण भागात अशा घटना वाढल्या आहेत. बेळगाव शहर परिसरातही कौटुंबिक हिंसाचाराच्या 160 हून अधिक घटना घडल्या आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात अशा घटनांची संख्या 350 हून अधिक आहे. किरकोळ प्रकरणात कौन्सिलिंग केले जाते. गंभीर प्रकरणांची पोलीस स्थानकात नोंद होते. महिलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर दिला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.









