संबंधित खात्याने तात्काळ दखल घ्यावी;
ओटवणे प्रतिनिधी
चराठा – कारिवडे मुख्य रस्त्यादरम्यान पुनमवाडी तिठा बस स्टॉप येथे भला मोठा खड्डा पडल्यामुळे याचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसत आहे. तसेच तिठयावरच हा खड्डा असल्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघातही झाले आहेत. त्यामुळे संबंधित खात्याने याची तात्काळ दखल घेऊन हा खड्डा बुजवावा अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांच्यावतीने कारीवडे येथील सामाजिक युवा कार्यकर्ते रवी परब यांनी केली आहे.
दरम्यान माजगाव नाला येथे गुगल मॅपवर हा रस्ता कोल्हापूरसह पुण्याकडे जाणारा असा दाखविण्यात आल्यामुळे बांदा येथून कोल्हापूरसह पुण्याकडे जाणारे पर्यटक व इतर प्रवासी माजगाव नाला येथुन चराठा मार्गे या मार्गावरूनच प्रवास करतात. पर्यायाने या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते.
एक तर अरुंद रस्ता असलेल्या या तिठयावर तीव्र वळण असल्यामुळे या खड्ड्यात दुचाकी व चार चाकी वाहने जाऊन लहान मोठे अपघात झालेले आहेत. तसेच याच ठिकाणी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यामुळे संबंधित खात्याने याची तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा होणाऱ्या अपघातास संबंधित खाते जबाबदार राहणार असल्याचा इशारा रवी परब यांनी दिला आहे.









