परदेशातून आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूवरून देशभर चर्चा सुरू असतानाच देशातील वाघांच्या मृत्यूचीही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या सात महिन्यांतच तब्बल 112 वाघांचा मृत्यू झाला असून, ही वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरली आहे. नैसर्गिक मृत्यूबरोबरच शिकार हेही वाघांच्या मृत्यूमागचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. हे पाहता आगामी काळात ‘व्याघ्र बचाव मोहीम’ तीव्र करावी लागणार आहे.
विसाव्या शतकाच्या सुऊवातीला जगभरात वाघांची संख्या एक लाखांच्या आसपास असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. तर ही संख्या 50 हजारांपर्यंतच होती, असेही काही मंडळी सांगतात. आज जगातील व्याघ्रसंख्या 4 ते 5 हजारांच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. यातील बहुसंख्य म्हणजेच 3 हजारांवर वाघ भारतात आहेत, असे आकडेवारी सांगते. त्यामुळे जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश ही भारताची ओळख आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणीदेखील वाघ हाच आहे. वाघाचा अधिवास असणे, हे कोणत्याही जंगलाच्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मागच्या काही वर्षांत व्याघ्रसंख्या वेगाने वाढत असल्याचेही दाखले मिळतात. मात्र, वाघांच्या मृत्यूचा आकडाही तितकाच मोठा असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. मागच्या दहा वर्षांचा विचार केला, तर तब्बल एक हजार 59 वाघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

वाघांच्या मृत्यूत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आघाडीवर
राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने यासंदर्भातील अहवाल प्रकाशित केला असून, यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वास्तविक, सर्वाधिक व्याघ्रसंख्या असलेले राज्य ही मध्य प्रदेशची ओळख आहे. मात्र, वाघांच्या मृत्यूतही हे राज्य आघाडीवर असल्याचे पहायला मिळते. मागच्या सात महिन्यांचा विचार केला, तर मध्य प्रदेशात 27 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक असून, राज्यात आत्तापर्यंत 20 वाघ मृत्युमुखी पडलेले आहेत. तर उत्तराखंडमध्ये 14 वाघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्येही हीच स्थिती असल्याचे दिसते.
टाळेबंदीतही जीवाला धोकाच
अहवालात अधिकांश मृत्यूंची नोंद ही नैसर्गिक म्हणून दाखविली असली, तरी त्यात लहान मोठ्या शिकारींचे प्रमाणही लक्षणीय असल्याची माहिती समोर आली आहे. 2021 व 2022 ही कोरोना काळातील वर्षे मानली जातात. टाळेबंदीचा हा काळ असल्याने या काळात बऱ्याच गोष्टी ठप्प होत्या. असे असले, तरी या काळात उलटपक्षी वाघांच्या शिकारी अधिक जोमाने सुरू असल्याचे आकडेवारी सांगते. या वर्षांमध्ये अनुक्रमे 127 व 121 वाघांना जीव गमवावा लागला. वास्तविक टाळेबंदी असल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी राहील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात या दोन वर्षांतच सर्वाधिक मृत्यू झाले, हे काहीसे आश्चर्यकारक मानले जाते.
महामार्ग अन् करंटही ठरतोय जीवघेणा
वाघाची शिकार हे मृत्यूमधील महत्त्वाचे कारण मानले जाते. वाघाच्या कातडीला सोन्याची किंमत आहे. त्यामुळे वाघाची शिकार करून त्याच्या कातडीपासून लाखो ऊपये कमाविण्याचा शिकाऱ्यांचा उद्देश असतो. त्यातून त्यांची शिकार केली जाते. मागच्या पाच वर्षांत 24 वाघांची शिकार झाल्याचे सांगण्यात येते. पिकाचा बचाव करण्यासाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून विद्युत करंट लावले जातात. हा करंट लागूनही वाघांचा मृत्यू झाल्याची उदाहरणे सापडतात. अशा प्रकारे या कालावधीत दहा वाघ जीवास मुकले आहेत. जंगलातून जाणारा महामार्गही अनेकदा वन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरतो. बारा वाघांचा असा अपघाती मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना तर ताजीच आहे. याखेरीज आजार, नैसर्गिक मृत्यू हेही महत्त्वाचे कारण होय. ही संख्या 67 इतकी आहे.

अशी घ्यावी लागणार काळजी…
अपघात व शिकारीमुळे होणारे मृत्यू हे नक्कीच रोखता येऊ शकतात. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी जंगलातील रस्त्यांवरून प्रवास करताना चालकांना वेग मर्यादा सांभाळावी लागेल. त्याचबरोबर जंगलातील प्राण्यांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक असेल. शेतकऱ्यांना शेतपिकाचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवाव्या लागतात. मात्र, याची झळ वाघासारख्या प्राण्यांना बसू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे.
सह्याद्रीच्या पट्ट्यात होणार स्थलांतर
चंद्रपूरचा पट्टा हा वाघांचा समृद्ध मानला जातो. या भागातही वाघांची संख्या चांगली असली, तरी तेथील मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या जिल्ह्यात आज वाघांची संख्या 200 हून अधिक आहे. मात्र, तेथील वाघ सह्याद्रीसह अन्य काही भागांत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. वाघांना राहण्यासाठी क्षेत्र कमी पडल्याने त्यांच्यात झुंजी होतात व त्यातूनही त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. तसे असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी नक्कीच त्यांचे स्थलांतर करावे लागेल. आज महाराष्ट्रासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या राज्यात 350 हून अधिक वाघ आहेत. वाघांसाठी अधिक अनुकूल स्थिती निर्माण करतानाच व्याघ्र पर्यटनाची व्याप्ती वाढविण्याकरिता पुढच्या काळात पावले उचलावी लागतील.
व्याघ्र संख्या अन् पर्यटन
देशात ताडोबासह वेगवेगळी अभयारण्य आहेत. या अभयारण्यांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. अभयारण्याची सफर आणि व्याघ्रदर्शन हा पर्यटकांच्या व व्याघ्रप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. स्वाभाविकच जंगलच्या राजाचे जंगलात दर्शन होणे, हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे व्याघ्रसंख्या चांगली असणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे पाहता वाघांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक ठरते.
घटता अधिवास अन् अतिक्रमण
वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष सनातन आहे. मात्र, दिवसेंदिवस वाघांचा अधिवास नष्ट होत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे दाट जंगले विरळ होत चालली आहेत. त्यामुळे वाघांना बऱ्याचदा आपला मोर्चा मनुष्यवस्तीकडे वळवावा लागतो. जंगलातील प्राण्यांचे प्रमाणही कमी होत असून, शिकारीकरिता जंगलच्या या राजाला वणवण करावी लागत आहे. म्हणूनच माणसांवरील व्याघ्रहल्ले वाढताना दिसतात. त्यामुळे वाघांकरिता अधिकाधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर पुढच्या काळात भर द्यावा लागेल. निसर्ग साखळीतील एक घटक कमी झाला, तरी त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची भीती संभवते. म्हणून वाघ वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.
न्यायालयाचीही काळजी
2017 मध्ये अनुपम त्रिपाठी यांनी वाघांच्या मृत्यूबाबत सर्वौच्च न्यायलयानेही चिंता व्यक्त केली होती. वाघाच्या मृत्यूबाबत माहिती सादर करा, असे खंडपीठाने अलीकडेच केंद्राला सांगितले होते. हे पाहता ‘सर्वंकष व्याघ्रधोरण’ ही काळाची गरज ठरते.
चित्ता प्रकल्पाचा धडा
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी चित्ता प्रकल्पाचे काय झाले, हे आपण पाहतच आहोत. पंतप्रधानांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सप्टेंबर 2022 मध्ये वाजतगाजत नामिबियातून भारतात आठ चित्ते आणण्यात आले. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेतूनही पुन्हा 12 चित्ते आणले गेले. मध्ये प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांची रवानगी करण्यात आली. मात्र, एकामागोमाग एक चित्त्यांचे मृत्यू सुरूच असून, या प्रकल्पाच्या यशस्वितेबद्दलच आता साशंकता निर्माण झाली आहे. एकेकाळी भारतात मुबलक चित्ते असल्याचे सांगितले जाते. आज त्याच देशात इतर देशातून चित्ते मागवावे लागतात आणि इतके सारे करूनही त्यांचे मृत्यू होतात, हा आपल्यासाठी मोठा धडा आहे. शिवाय कोणताही प्रकल्प राबविताना त्याच्या सर्व बाजू तपासून तज्ञांच्या सल्ल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. हेही ध्यानात घ्यायला पाहिजे.
वाघांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणे
नैसर्गिक मृत्यू
मानवी शिकार
विजेचा धक्का
अपघात व इतर
मागच्या काही वर्षांतील व्याघ्र मृत्यूची आकडेवारी
2018 101
2019 96
2020 106
2021 127
2022 121
2023 112
देशात व्याघ्रप्रकल्प सुरू होऊन 50 वर्षे झाली आहेत. आज 53 व्याघ्रप्रकल्प आरक्षित असून, यशस्वीपणे हा प्रकल्प राबविला जात आहे. दरवर्षी साधारण 5 ते 6 टक्क्यांनी वाघांच्या संख्येत वाढ होणे, ही सकारात्मक बाब असली, तरी त्यांच्या मृत्यूच्या संख्येकडेही डोळेझाक करता येणार नाही. भविष्यात कोणताही धोका उत्पन्न होऊ नये, याकरिता आत्तापासूनच काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. आगामी काळात वाघासारख्या प्राण्याचा अधिवास भारतासारख्या देशातच प्रामुख्याने राहिला, तर स्वाभाविकच ‘टायगर कंट्री’ म्हणून आपल्याकडे पाहिले जाऊ शकते. त्यातून भारतीय पर्यटनाला निश्चितपणे नवी झेप घेता येणे शक्य होईल. त्यामुळे ‘व्याघ्र संवर्धना’वर देशाला भविष्यात विशेष फोकस ठेवावा लागेल.
प्रशांत चव्हाण, पुणे









