उताऱ्यासह इतर कागदपत्रे मिळणे सोपे, आमदारांच्या हस्ते उद्घाटन
खानापूर : राज्य सरकारने सर्व कार्यालयातील जुन्या कागदपत्रांचे तसेच जमिनीच्या नोंदीचे संगणकीकरण सुरू केले असून, या पुढे शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला आपल्या मालमत्तेची तसेच शेतीची आणि इतर उताऱ्यांची माहिती डिजिटलायझेशन झाल्याने मोबाईलवरही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता सर्व कागदपत्रांची माहिती मिळणे सहज सोपे होणार आहे. असे उदगार खानापूर येथील तहसीलदार कार्यालयातील जुन्या कागदपत्राच्या संगणकीकरण उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार, सुनिल देसाई, मारुती पाटील, चंबाण्णा होसमणी, रवि काडगी, गुंडू तोपिनकट्टी यासह कर्मचारी उपस्थित होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते संगणकाचे पूजन करून संगणकीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी रेकॉर्ड रुममधील सर्व जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून, या पुढे जमिनीसह इतर महसूल विभागाची माहिती घरबसल्या तपासता येणार आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या काही दिवसात सर्व कागदपत्रे वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.
सहजासहजी फसवणूक नाही
आमदार विठ्ठल हलगेकर पुढे म्हणाले, जुन्या कागदपत्रांचे संगणकीकरण हे क्रांतीकारी पाऊल असून यामुळे कोणाचेही सहजासहजी फसवणूक होणार नाही. जमिनीच्या सर्व जुन्या नोंदी सर्वसामान्याना तपासता येणार आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारास आळा बसेल. तसेच नागरिकांना आपल्या कागदपत्रासाठी कार्यालयाना खेटे मारण्यापासून कायमची मुक्तता मिळणार आहे.









