मंत्री एच. के. पाटील : बेंगळुरात रेणुका यल्लम्मा क्षेत्र पर्यटन मंडळाची बैठक
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा राज्यातील भाविकांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या सौंदत्ती यल्लमा येथे भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.
शनिवारी रेणुका यल्लम्मा क्षेत्र पर्यटन विकास मंडळाच्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत ते म्हणाले, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर सौंदत्ती यल्लम्मा डोंगर येथे व्यापक विकासकामे राबविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. भरत पौर्णिमेदरम्यान यल्लम्मा डेंगरावर झालेला सुधारणात्मक बदल पाहून आनंन झाला, असे सांगून त्यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाची प्रशंसा केली.
मागील भरत पौर्णिमेला 3 लाख भाविकांना ताकाचे वाटप करण्यात आले. यावरून सरकार भाविकांची काळजी घेत असल्याची भावना निर्माण झाली. यंदा भरत पौर्णिमेवेळी भाविकांच्या सोयीसाठी एलईडी स्क्रिन बसविण्यात आले होते. काही भाविक स्क्रिनवर देवीचे दर्शन झाल्याने स्क्रिनची पूजा करताना दिसून आले, असेही ते म्हणाले.
सौंदत्ती यल्लम्मा डोंगर परिसरात प्रशस्त वाहन पार्किंग सुविधा, तिरुपतीच्या धर्तीवर क्यू कॉम्प्लेक्स, वास्तव्याची सोय, बैलगाडीतून येणाऱ्यांना पशू आहाराची सोय म्हणून चाऱ्याची व्यवस्था, रिंग रोड, वृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था यासह विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली जातील.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, पर्यटन खात्याच्या सचिव सलमा फहीम, धर्मादाय खात्याचे आयुक्त टी. वेंकटेश, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकारी उपस्थित होते.









