खुल्या जागेवर मालकी हक्क सांगत पाटील कुटुंबीयांकडून विरोध : पोलिसांची मध्यस्थी
वार्ताहर/येळ्ळूर
येळ्ळूर लक्ष्मी चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न न सुटल्याने दि. 16 रोजी होणारे कंपाऊंडचे भूमिपूजन रखडले. या कार्यक्रमासाठी गावात पाळक दिवसही ठेवण्यात आला होता. ग्रा.पं. अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, पी.डी.ओ. पूनम गडगे, ग्रा.पं. सर्व सदस्य, चांगळेश्वरी विश्वस्त मंडळ, कलमेश्वर विश्वस्त मंडळ, लक्ष्मी विश्वस्त मंडळासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने लक्ष्मी चौकात जमले होते. रितसर कार्यक्रमाची सुरुवात होऊन लक्ष्मीस्थळाच्या उत्तर बाजूला भूमिपूजन कार्यक्रम सुरू करताना खुल्या जागेवर आमचा मालकी हक्क आहे, असे सांगत पाटील कुटुंबीयांकडून विरोध झाला. वाद, प्रतिवाद आणि हद्दीवरुन चाललेल्या वादावादीमुळे आज होणारा भूमिपूजनाचा कार्यक्रम रखडला. त्यामुळे जनतेमध्ये रोष व नाराजी पसरली.
मागीलवर्षी दि. 31 जुलै 2024 ला वादी व ग्रामपंचायत अध्यक्ष, पी.डी.ओ. सदस्य व गावकरी यांच्यात चर्चा होऊन समेट झाला होता. आणि लक्ष्मी स्थळापासून 12 फुटावर कंपाऊंड भिंत बांधण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम घेण्यात आला असताना पाटील कुटुंबीयांनी विरोध दाखवल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा मिटींग घेऊन रितसर जागेची मोजणी घेत कंपाऊंड बांधण्याचे ठरवून गावकऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी देवीच्या कामासाठी आडमुठेपणा सोडून त्यांना वारंवार सहकार्य करण्याची विनंती केली. पण त्यांनी आपला हेका सोडला नाही. वादावादीचा प्रसंग लक्षात घेत पोलीस प्रशासनाने दोन्हीकडील मंडळींचे म्हणणे ऐकून घेत त्यांना रितसर कागदपत्राच्या आधारे वाद मिटवावा, असे सांगून वाद संपवला आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.
उद्घाटनप्रसंगी वाद : नागरिकांतून आश्चर्य
मागीलवर्षी गावाच्या व देवीच्या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल देसाई व पाटील कुटुंबीयांचा ग्रामपंचायतीमार्फत सत्कार करून त्यांचे आभारही माणण्यात आले होते. पण कामाच्या उद्घाटनाप्रसंगी हा वाद पुन्हा निर्माण झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.









