नवीन तुकडीसाठी प्रवेश सुरु : डॉ.विश्वनाथ सावंत यांची माहिती
प्रतिनिधी /फोंडा
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट म्हणजेच भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गोवा शाखेतर्फे स्वच्छता निरीक्षक (सेनेटरी इन्स्पेक्टर) या एका वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रवेश स्वीकारले जाणार आहेत. बांदोडा येथील संजीवन संस्थेमध्ये दर शनिवार व रविवारी हे वर्ग चालतात, अशी माहिती संस्थेचे गोव्यातील विभागीय संचालक डॉ. विश्वनाथ सावंत तळावलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात गेल्या आठ वर्षांपासून हा पदविका अभ्यासक्रम सुरु असून सरकारी कर्मचाऱयांसाठी त्यामध्ये 50 टक्के जागा आरक्षित आहेत. याशिवाय इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नातून गोव्यात भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची शाखा सुरु झाली व गेल्या आठ वर्षांपासून स्वच्छता निरीक्षक हा कोर्स सुरु आहे. आत्तापर्यंत गोव्यातील 350 सरकारी कर्मचाऱयांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कुठल्याही सरकारी खात्याच्या कर्मचाऱयांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वच्छता निरीक्षक बढती मिळू शकते. विशेष करून आरोग्य खाते, नगरपालिका कर्मचाऱयांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. सैन्य दलात, भारतीय रेल्वेत, न्यायालयात, पोर्ट ट्रस्ट अशा विविध ठिकाणी आता भारत सरकारने स्वच्छता अधिकारी ही नवीन पदे सक्तीची केली आहेत. नव्याने अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया विद्यार्थ्यांना याठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात, असे सावंत यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त या अभ्यासक्रमाला केवळ भारतातच नव्हे तर दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका व अरब राष्ट्रातही मान्यता आहे. तारांकित हॉटेल्स, इस्पितळे तसेच अन्य विविध खासगी क्षेत्रामध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून ही पदविका उपयुक्त ठरत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
फायरमन ट्रेनिंग व इस्टेट मेनेजमेंट हे सहा महिन्यांचे अन्य दोन नवीन कोर्स येत्या जानेवारीपासून भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे सुरु करण्यात येणार आहेत. याशिवाय टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स या नामांकित संस्थेच्या माध्यमातून गोव्यात हॉटेल मेनेजमेंट व हेल्थ मेनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरु होणार असून त्यासंबंधी अधिक माहिती संजीवन बांदोडा येथील कार्यालयात मिळू शकते, असे सावंत यांनी सांगितले.









