अनेक ग्रामपंचायतींकडून पूर्ण काम ताब्यात घेण्यासाठी केला जातोय विलंब:सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई प्रस्तावित करण्याबाबत सीईओ चव्हाण यांचे निर्देश
कोल्हापूर/कृष्णात चौगले
ग्रामपंचायत हद्दीत खासदार, आमदार निधी तसेच शासनाच्या विविध विकास योजनांतील मंजूर कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीने देखभाल दुरुस्ती ठराव दिला असल्यास ते काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे आवश्यक आहे. पण काही ग्रामपंचायतींकडून कामे ताब्यात घेतली जात नसल्याच्या जिल्हा परिषदेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण झालेली कामे ताब्यात घेण्यास नकार दिल्यास अथवा विलंब केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवकाची पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश जि. प. सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायतीने मासिक सभा ठरावाद्वारे मंजूर विकास कामांसाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेतली असल्यास पूर्ण झालेली कामे ताब्यात घेण्यास नकार दिल्यास अथवा विलंब केल्यास सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39 प्रमाणे आणि जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) 1964 नुसार ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाई प्रस्तावित करावी, असे गटविकास अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये पूर्ण झालेल्या व ताब्यात घेतलेल्या विकास कामांच्या नोंदी महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 मधील नमुना 22 स्थावर मालमत्ता नोंदवही (रस्ते व जमिनी व्यतिरिक्त) व नमुना 23 नोंदवहीमध्ये (ताब्यातील रस्त्याची नोंदवही) घ्याव्यात. बांधकामांच्या व रस्त्याच्या नोंदी करताना प्रत्येक मालमत्तेसाठी एका पानावर एकच नोंद घेण्यात यावी. ग्रामपंचायतीने काम ताब्यात घेताना सादर केलेल्या मोजमाप पुस्तिकेतील नोंदीप्रमाणे कामाचे ठिकाण आणि खर्चाच्या नोंदी कराव्यात. वर्षाअखेरीस गोषवाऱ्यासह सरपंच व ग्रामसेवकांनी त्या नोंदी प्रमाणित कराव्यात असे सीईओ चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
जमिनीची नोंदवही अद्यावत करताना एका पानावर एकच नोंद करा
ग्रामपंचायतीकडील महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 नमुना 24 (जमिनीची नोंदवही) अद्यावत करताना नोंदवहीवर एका पानावर एकच नोंद करावी. पंचायतीने खरेदी केलेल्या, संपादित केलेल्या, शासनाकडून हस्तांतरित केलेल्या सर्व जमिनी, मोकळ्या जागा, पडीक जमिनी, गायरान जमिनी आदींच्या स्वतंत्र नोंदी कराव्यात. जमिनीच्या मालकीचे 7/12 व सिटी सर्व्हेकडील प्रॉपर्टी कार्डचे उतारे दरवर्षी घेऊन दप्तरी जतन करावेत. वर्षांअखेरीस गोषवाऱ्यासह सरपंच व ग्रामसेवकांनी सदर नोंदी प्रमाणित कराव्यात. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) यांनी ग्रामपंचायत भेटीवेळी याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा, असे निर्देशही सीईओ चव्हाण यांनी दिले आहेत.
त्रुटीस अधीन राहून काम ताब्यात घ्या – सीईओ
ग्रामपंचायत हद्दीत विविध शासकीय विकास योजनेतून कामे पूर्ण केली असल्यास ती कामे ग्रामपंचायतीला ताब्यात देतांना संबंधित कंत्राटदारांनी त्या कामाचे अंदाजपत्रक, झालेल्या कामाचे मुल्यांकन व कामाचे फोटो आदी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. पूर्ण झालेली कामे संबंधित कार्यान्वित यंत्रणेच्या तांत्रिक अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत ताब्यात घ्यावीत. उपस्थितांनी ताब्यात घ्यावयाच्या कामाबाबत निदर्शनास आणलेल्या त्रुटी ताबापट्टीमध्ये स्पष्टपणे नोंद कराव्यात. त्रुटीस अधीन राहून ग्रामपंचायतीने काम ताब्यात घ्यावे. त्रुटी पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित कार्यान्वित यंत्रणेची, कंत्राटदाराची राहील असे सीईओ चव्हाण यांनी सूचित केले आहे.