प्रगतीचा आढावा दर महिन्याला सादर करावा : केआरआयडीएल प्रगती आढावा बैठकीत राहुल शिंदे यांची अभियंत्यांना सूचना
बेळगाव : जिल्ह्यामध्ये विविध खात्याची केंद्रीय कामे तसेच स्थानिक कामे अशा एकूण 1347 कामांना सुरुवात झाली असून यापैकी पूर्ण झालेली कामे 760 आहेत. प्रगतीपथावर असलेली कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचना जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केली. कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लि. (केआरआयडीएल)च्या बेळगाव व चिकोडी विभागातील विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते. केआरआयडीएल बेळगाव आणि चिकोडी विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे. कामे झालेल्या प्रगतीचा आढावा प्रत्येक महिन्याला जिल्हा पंचायतीला सादर करावा. कामाच्या ठिकाणी कोणतीही समस्या उद्भवल्यास संबंधित भागाच्या आमदारांच्या निदर्शनास आणून द्यावे. समस्या दूर करून काम पूर्ववत सुरू करावे, अशी सूचना शिंदे यांनी केली.
ग्रामविकास योजना व मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती केआरआयडीएल बेळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत शेगुणशी यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर राहुल शिंदे म्हणाले की, स्थानिक पातळीवर प्रलंबित असलेल्या कामासाठी ग्राम पंचायतीकडून अनुदान मिळवून कामे वेळीच पूर्ण होण्याकडे कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष द्यावे. अनुदानाचा अभाव असल्यास आपल्या निदर्शनास आणून द्यावे. जिल्हा पंचायतीचे उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, केआरआयडीएलचे चिकोडी विभाग कार्यकारी अभियंता रेणूज्योती पी. नारायणकर, कित्तूर उपविभाग साहाय्यक कार्यकारी अभियंता के. रामण्णा, सौंदत्ती उपविभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता एच. ए. कद्रापूरकर, अथणी विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता शंकर चव्हाण यांसह कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.









