गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : अनगोळ वाडाकंपाऊंड येथून आनंदनगर रस्त्यापर्यंत ड्रेनेज पाईप घालण्यासाठी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. ही खोदाई अर्धवट आहे. आता गणेशोत्सवाच्या तोंडावरच ही खोदाई करण्यात आल्यामुळे अनगोळ परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोणतीही खोदाई पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. मात्र पावसाळ्यातच ही खोदाई केल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. रस्ते करायचे त्यानंतर खोदाई करायची, असे प्रकार अनगोळ, वडगाव परिसरात सुरू आहेत. वास्तविक ड्रेनेज पाईपलाईन यापूर्वीच घालणे गरजेचे होते. पण पावसाळ्यातच ही खोदाई करण्यात आली आहे. आता सणांपूर्वी हे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्रावणमासाने विविध सणांना सुऊवात होते. त्याच काळात अशाप्रकारे खोदाई करण्यात येत आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. खोदाई करून तातडीने ते काम पूर्णही केले जात नाही. संथगतीने कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून, गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









