पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमवेत विविध ठिकाणच्या कामांची पाहणी
बेळगाव : दर्जा राखत कामे वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाऊले उचलण्याच्या सूचना लघु पाटबंधारे, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री एन. एस. बोसराजू यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगावचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोमवार दि. 20 रोजी आमदार निखिल कत्ती यांच्या समवेत बेळगाव विभागातील लघु पाटबंधारे व भूजल विकास विभागाच्या कामांची पाहणी केली. सुलतानपूर पाटबंधारे प्रकल्पातून 19 तलाव भरण्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर यरनाळ येथील ब्रिजकम बॅरेजवर 100 पर्यटकांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. बेळगाव विभागांतर्गत सुरू असलेल्या पाटबंधारे, ब्रिज कम बॅरेज आणि चेकडॅमच्या कामांच्या प्रगतीची माहिती मंत्र्यांनी घेतली. प्रकल्पांना होत असलेल्या विनाकारण दिरंगाईची माहिती मिळाल्यानंतर मंत्र्यांनी याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. गुणवत्ता राखून कामे वेळेत पूर्ण करावीत, ज्या ठिकाणी कामांना विलंब होत असेल त्या ठिकाणच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची सूचना मंत्री बोसराजू यांनी अधिकाऱ्यांना केली.









