पाणी खुल्या जागेत साचल्याने दुर्गंधी : काम संथगतीने सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास
बेळगाव : आनंदनगर-वडगावपासून बळ्ळारी नाल्यापर्यंतच्या गटारीची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे या परिसरातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा तातडीने या गटारीची दुरुस्ती करावी. याचबरोबर रस्ताही पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे. या गटारीमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत आहे. ते पाणी खुल्या जागेमध्ये साचून आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रस्ताही खोदण्यात आला आहे. दोन्ही बाजुला खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे धुरळा उडत आहे. एकूणच या परिसरातील जनतेला राहणे कठीण झाले आहे.
डासांमुळे साथीच्या रोगांत वाढ
आनंदनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर या परिसरातील व्यावसायिक तसेच रहिवाशांना त्रास होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. गटारीमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आले असून त्या गटारी साफ करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मात्र यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तेंव्हा तातडीने या गटारीची आणि रस्त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









