जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना : जिल्हा पंचायतमध्ये दिशा आढावा बैठक
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट येथे रखडलेले रेल्वेओव्हरब्रिज (आरओबी) उभारण्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. या कामासाठी कोणत्याच प्रकारे विलंब लावण्यात येवू नये. सध्या पाऊस नसल्याने कोणताच अडथळा नाही. यासाठी सदर काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. येथील जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये खासदार इराण्णा कडाडी, मंगला अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय दिशा समितीच्या विकास आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना केली. दिशा विकास आढावा बैठकीमध्ये खासदार मंगला अंगडी यांनी आरओबीच्या विकासकामांबद्दल रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कामाला विलंब होत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. नियोजित आराखड्यामधील काही त्रुटी दूर करून काम त्वरित सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी खासदार इराण्णा कडाडी यांनी रेल्वेच्या ट्रॅकसाठी सर्वेक्षणाच्या कामाला विलंब होत असल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला. नंदिहळ्ळी व इतर भागातील शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाला विरोध करण्यात येत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सांबरा येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी जागा संपादित केली आहे. येथील विकासकामांबद्दल विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. विमानतळाशेजारी असणाऱ्या सांबरा गावातील नागरिकांना स्मशानभूमीला ये-जा करण्यासाठी आवश्यक रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व इराण्णा कडाडी यांनी यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. उज्ज्वला योजनेतून यापूर्वी गॅस घेतलेल्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार गॅस उपलब्ध करून द्यावेत. तसेच नव्याने उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना गॅस उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घटले
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घटल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पीक-पाण्याचा आढावा घेण्यात आला. 11 तालुक्यांपैकी काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तेथील परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे, अशी माहिती साहाय्यक कृषी विभागाचे संचालक शिवनगौडा पाटील यांनी दिली. कृषी पिकांना विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना करून देण्यात यावा, याची जनजागृती करून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, अशी सूचना करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 14 वा हप्ता देण्यात आला आहे. ई-केवायसी करण्यात आली नसल्याने काही शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळत नाही. याची खातरजमा करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना करण्यात आली. आरोग्य खात्याकडून केंद्र सरकारच्या योजना समर्पकपणे राबविल्या जात आहेत. गर्भवती महिलांसाठी प्रसूतीनंतर दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती देण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अधिक समर्पकपणे राबविण्यावर भर देण्यात यावा. आवश्यक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. आरोग्य अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अहवाल द्यावा, अशी सूचना करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पोलीस उपायुक्त एच. टी. शेखर, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुक्ला, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक राजीव कुलेर, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक श्रीशैल कंकणवाडी, समाज कल्याण खात्याचे उपसंचालक लक्ष्मण बबली, जिल्हा पंचायत योजना अधिकारी रवी बंगारप्पण्णवर आदी उपस्थित होते.
कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याबाबत अधिकाऱ्यांकडून चालढकल
कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षणाची माहिती देण्यात अधिकाऱ्यांकडून चालढकल करण्यात येत असल्याने त्यांची कानउघडणी करण्यात आली. ग्रामीण भागातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्याचे डिजिटलायझेशन करण्यात येत असल्याची माहिती एडीएलआरकडून देण्यात आली. हे काम प्रगतिपथावर असून अद्याप अपूर्ण असल्याचे सांगितले. शेतीचेही सर्वेक्षण करण्यात यावे. शेतकऱ्यांमध्ये यावरून मोठे वाद होत असतात. याबाबतही विचार व्हावा, असे कडाडी यांनी सांगितले.









