उचगाव ग्रामपंचायतीला नागरिकांचे मागणीचे निवेदन
वार्ताहर/उचगाव
उचगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागेशनगर वॉर्ड क्रमांक पाच व सहा या भागात नवीन रस्ता करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या उजव्या बाजूने गटारीचे काम झालेले नसल्याने पावसाळ्याध्ये पाणी रस्त्यावरून वाहत येऊन शेतीमध्ये आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या घरामधून शिरत असल्याने घरांना धोका होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल तातडीने घ्यावी अशा प्रकारचे निवेदन पीडीओ यांना नागेशनगर येथील नागरिकांतर्फे देण्यात आले आहे. नागेशनगर येथील रस्त्याच्या उजव्या बाजूला गटारीचे आणि सीडीचे काम पूर्ण झाले नसल्याने नुकत्याच झालेल्या वळीव पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत घरामध्ये शिरत असल्याने घरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने गटारीचे आणि सीडीचे काम करावे अशी मागणी नागेशनगर वॉर्ड क्रमांक पाच आणि सहा येथील नागरिकांनी केली आहे.









