खासदार शेट्टर यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते. पाणीपुरवठा मंडळ व सांडपाणी व्यवस्थापन मंडळ, महानगरपालिका व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. संपादित केलेल्या जमिनींसाठी अधिक भरपाई मंजूर करण्यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे खासदारांनी स्पष्ट केले. बेळगाव शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामानाने सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे बनले आहे. हलगा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी संपादित केलेल्या जमिनींसाठी अधिक भरपाई मंजूर करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी खासदारांना दिली.
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन
यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढू असे आश्वासन देण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची माहिती खासदारांनी घेतली. घनकचरा विल्हेवाट लाण्यासंदर्भात स्मार्ट सिटीच्या संचालकांशी चर्चा झाली. यावेळी महापालिका आयुक्त शुभा बी., स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक अफ्रिन बानू, पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता अशोक शिरुर यासह इतर उपस्थित होते.









