स्थानिक नागरिकांची मागणी : खडीमुळे वाहनधारकांना त्रास
बेळगाव : विजयनगर रक्षक कॉलनी येथील रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खडी टाकून अनेक दिवस उलटले तरी डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. सदर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे. पाईपलाईन रोड ते विजयनगरपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील रक्षक कॉलनी येथील मुख्य रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले आहे. रस्ता खराब झाल्याने जुना रस्ता खोदाई करून त्यावर खडी पसरविण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडी पसरविण्याचे काम सुरूच असून रस्त्यावर खडीचे ढिगारेही टाकण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. खडीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्यावेळी जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. लहान, सहान अपघात घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.









