जिह्याची पाहणी पूर्ण
जागतिक बँक पथक व जिल्हाधिकाऱ्यांची ‘जलसंपदा’च्या सल्लागार संस्थेला सूचना
कोल्हापूर
कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त जलसंपदा विभागाकडील सल्लागार संस्थेने नियोजित वेळापत्रकानुसार सर्वेक्षण पूर्ण करावे, अशा सूचना जागतिक बँकेचे पथक व जिल्हाधिकारी येडगे यांनी संस्थेला केल्या.
पंचगंगा-कृष्णा नदीच्या महापूर नियंत्रणासाठी उपाययोजना व भूस्खलनाच्या सौम्मीकरणासाठी महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 338 कोटींचा निधी जागतिक बँक देणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीवर उपाययोजना सुचवण्यासाठी जागतिक बँकेच्या पथकाने 23 व 24 रोजी कोल्हापूर व सांगली जिह्याची पाहणी केली. याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी जागतिक बँकेच्या रुमिता चौधरी, योकिओ तानाका, तसेच मित्रा संस्थेचे संचालक (टेक्निकल) विनय कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता संदीप दावणे, प्रवीण पारकर, मित्राचे सदस्य आदित्य येजरे, नीरज मिश्रा, भूजल सर्वेक्षण विभागाचे जयंत मिसाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करा
विनय कुलकर्णी म्हणाले, पूर परिस्थिती उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानुसार कामे करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सर्व प्रथम पावसाळ्यापूर्वी सर्व्हेक्षण पूर्ण करावे. जिह्यातील पूर परिस्थिती व अतिवृष्टीचे प्रमाण पाहून धरणातील विसर्गाबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे.
पूर पूर्वानुमान यंत्रणा बळकट करणार
जिल्हाधिकारा म्हणाले, जागतिक बँकेच्या वतीने कोल्हापूर, सांगली व सातारा जिह्यातील कृष्णा नदीच्या उपनद्यांचे व नाल्यांचे सर्व्हेक्षण करुन पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच भूस्खलनाच्या सौम्मीकरणासाठी उपाययोजना केल्या जातील. याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी या विभागांतर्गत ‘पूर पूर्वानुमान’ यंत्रणा बळकट करण्यात येणार आहे.
सर्व्हेक्षणासाठी तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांची मदत घ्या
एमआरडीपी प्रकल्पांतर्गत पूरप्रवण क्षेत्रातील उपाययोजनांबाबत सर्व्हेक्षण करण्यात येणार असून यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने सल्लागार कंपनीची नियुक्ती केली. या सर्वेक्षणाचे काम फेब्रुवारीत सुरु करुन मे अखेर पूर्ण करावे. तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे सहकार्य घ्या. या प्रकल्पांतर्गत नदी खोलीकरण व रुंदीकरणही करण्यात येणार असून या प्रकल्पाशी निगडित नागरिक व नदी काठावरील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घ्या. एकाचवेळी ही दोन्ही कामे सुरु राहतील याची दक्षता घ्या, या कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येईल. तसेच जिह्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यानुषंगाने सूचना देण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नदीच्या पूरप्रवण क्षेत्राची पाहणी पूर्ण
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे व सल्लागार कंपनीचे टेक्निकल हेड फहीमुद्दीन यांनी जागतिक बँकेच्या पथकासमोर सादरीकरण केले. जागतिक बँकेच्या या पथकाने गुरुवारी राधानगरी धरण, पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. तर शुक्रवारी रंकाळा, कळंबा तलाव, शेंडा पार्क परिसराची पाहणी केली.








