45 जणांची मालमत्ता-घरे रुंदीकरणात जाणार : वाढीव भरपाई देण्याचा सूर
वार्ताहर/सांबरा
निलजी ते सांबरा विमानतळपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून, गुऊवारी प्रांताधिकाऱ्यांनी बैठक बोलावून ग्रामस्थांना घर व जागेच्या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले. मात्र बैठकीत वाढीव भरपाई देण्याचा सूर ग्रामस्थांतून ऐकावयास मिळाला. गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी ज्या ग्रामस्थांची मालमत्ता, घरे, खुली जागा रस्त्याच्या ऊंदीकरणात जाणार आहेत. अशा सर्व संबंधित ग्रामस्थांची बैठक बोलावली होती.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच नुकसानभरपाई
बैठकीमध्ये प्रांताधिकाऱ्यानी रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत पूर्ण प्रक्रिया सांगितली. सांबरा येथील एकूण 45 जणांची मालमत्ता व घरे रस्ता रुंदीकरणात जाणार आहेत. घर, संरक्षक भिंत, विहीर ,कूपनलिका व झाडे यांचा सर्व्हे करण्यात आला असून सरकारी बाजारभावानुसार योग्य ते मूल्यमापन करून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी वारसा, संगणक उतारा व संबंधित कागदपत्रे त्वरित देण्याचे आवाहन केले. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी काहींनी वाढीव भरपाई देण्यात यावी अशी प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे.









